Mumbai Tiranga Rally : "देशातील तरुण मुलांनी आज एक सुवर्णपान लिहिलं आहे. अंधभक्तांविरोधात अखेर देशभक्त जिंकले असून, आता देशात 'भाजप विरुद्ध भारत' अशा मोठ्या संघर्षाची सुरुवात झाली आहे," अशा शब्दांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. शिवाजी पार्क येथील जल्लोष मेळाव्यात ते बोलत होते. देशातील तरुण आंदोलकांनी (जेन झी) सरकारच्या झिंंज्या कशा उपटतात, हेच या आंदोलनातून दाखवून दिले आहे," अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर निशाणा साधला.
धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानिमित्त ठाकरे बंधूंनी मुंबईत जल्लोष मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याच्या सुरुवातीला 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे निराश होऊन जीवन संपवलेल्या २१ विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखवली. तसेच सर्वांना एक मिनिटांचे मौन बाळगून २१ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर "ज्या विद्यार्थ्यांनी या अन्यायामुळे आपले जीवन संपवले आहे, त्यांच्या यातना आणि त्यांचे बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही," असा निर्धार यावेळी करण्यात आला.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "जात, पात आणि धर्म बाजूला ठेवून देशातील तरुण पिढी अन्यायाविरुद्ध एकत्र आली आहे, याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. आज देशातील तरुण जागा झाला आहे आणि हेच चित्र देशाच्या भविष्यासाठी आशादायक आहे."
धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेताना मोदींना यातना झाल्या असतील, असा टोला लगावत नीट पेपरफुटीनंतर २१ विद्यार्थ्यांनी जीवन संपवले त्यांच्या कुटुंबीयांना तुमच्यापेक्षा हजारोपटीने अधिक याताना झाल्या आहेत. या यातना आम्ही कधीच विसणार नाही. आज मी येथे कोणत्याही निवडणुकीच्या विजयाचे अभिनंदन करण्यासाठी आलेलो नाही, तर देशाची लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या प्रत्येक देशभक्ताला अभिवादन करण्यासाठी आलो आहे. ही लढाई आता भाजपविरुद्ध भाजप किंवा राजकीय पक्षांपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती अंधभक्त विरुद्ध देशभक्त अशी झाली आहे."
"अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना स्वतःच्या खात्याकडे आणि घसरत्या रुपयाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, पण त्या नीटचा पेपरफुटीचे फायदे कोणते हे सांगत आहेत. रस्ते वाहतूक मंत्री रोज इथेनॉलवर गप्पा मारत आहेत. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देशाच्या संरक्षणाऐवजी धर्मेंद्र प्रधानाचे संरक्षण करण्यात व्यस्त आहेत, असा टोला लगावत मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवर्जून सांगायचे आहे की, निवडणुका गेल्या खड्यात! सत्ता टिकवण्यासाठी तुमचे मंत्री दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत, आता तरी पक्षाचे राजकारण सोडून देशाकडे लक्ष द्या, असेही ते म्हणाले.
"मोदींनी हे पाहिले आहे की मतं चोरता येतात, पण माणसांची मनं कधीच चोरता येत नाहीत. आज देशभर असंतोषाचा वणवा पेटला असून खऱ्या अर्थाने संघर्षाला आता सुरुवात झाली असल्याचा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तरुणांच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले, "ही वेळ लांबलचक भाषणे करण्याची नाही, तर शब्दांपेक्षा कृती करून दाखवण्याची आहे. देशातील तरुणांनी आज जो लढा उभारला आहे, त्याने इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल असे पान जोडले आहे. तरुणांमध्ये आलेली ही जाग आता अशीच कायम राहिली पाहिजे."
भाषण संपल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला आवाहन केले की, "राष्ट्रगीत झाल्यानंतर सर्वांनी शांततेने आणि काळजीपूर्वक आपापल्या घरी जावे." तसेच त्यांनी मुंबई पोलिसांच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक करत, "दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यातील काय फरक असतो, हे मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे," असे स्पष्ट केले.