राजन शेलार, मुंबई
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. प्रत्यक्षात निवडणूक घोषित झालेली नसली, तरी ती कधी होईल, याचा अंदाज बांधत आघाडी व युतीसाठीच्या चर्चेला धुमारे फुटू लागले आहेत. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीच्या चर्चेने सर्वांचे लक्ष वेधले आहे; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक उद्धव सेना महाविकास आघाडीतून लढणार की मनसेसोबत युती करून, हे अद्याप ठरले नसले, तरी उद्धव ठाकरे यांनी बंधू राज ठाकरे यांच्याबरोबरची भविष्यातील ‘राज’नीती राजधानी दिल्लीत स्पष्ट केली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या बैठकीसाठी ‘डिनर डिप्लोमसी’चे आयोजन केले होते. तृणमूल काँग्रेस व ‘आप’ या दोन राजकीय पक्षांव्यतिरिक्त इंडिया आघाडीतील 25 राजकीय पक्षांचे 50 नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे कुटुुंबासह दिल्लीत दाखल झाले होते. बैठकीदरम्यान उद्धव व राहुल गांधी यांची बंद दरवाजाआड स्वतंत्र भेटही झाली. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांनीही एकमेकांची गळाभेट घेतली.
राजधानीत राहुल गांधी यांना नवीन सरकारी बंगला मिळाला आहे. हे नवे घर राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना संपूर्ण फिरवून दाखवले. अर्ध्या तासात त्यांनी अनेक गप्पागोष्टी केल्या. ही भेट राजधानीत चर्चेचा विषय बनली होती. एकेकाळी काँग्रेसला आपला कट्टर विरोधक मानणार्या ठाकरे कुटुंबाने आता गांधी कुटुंबाशी चांगलाच घरोबा केला आहे; पण ही जवळीक विरोधकांना आयते कोलीत देणारी ठरणार आहे. या भेटीबाबत सत्ताधार्यांकडून प्रचारात ठाकरेंविरोधात वापर केला जाण्याची शक्यता आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौर्यावर होते. ते दिल्लीत जाणार म्हणून बैठकीत राज-उद्धव एकत्र येण्यावर चर्चा झालीच, शिवाय काँग्रेस व अन्य पक्षांची मनसेला सोबत घेण्याबाबत काय भूमिका असेल? ही युती सहज स्वीकारतील का? वेळ आलीच तर उद्धव हे राज यांच्यासाठी आघाडीवर ‘पाणी’ सोडण्याची तयारी दाखवतील, असे प्रश्न, शंका राजकीय वर्तुळात, प्रसारमाध्यमात रंगल्या होत्या; पण आघाडीच्या बैठकीदरम्यान राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या भेटीबाबत उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दुजोरा देत राहुल गांधींसोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे मान्य केले. राऊत यांनी भेटीतील चर्चेचा तपशील उघड केला नसला, तरी राज ठाकरे यांच्याबरोबरच्या युतीबाबत चर्चा झाल्याची दिल्लीत चर्चा आहे.
दिल्लीत दाखल झाल्यानंतर नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज यांच्याबद्दलच्या युतीबाबत महाविकास आघाडीत चर्चा होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला. हा प्रश्न आपसूकच पत्रकारांकडून येणार, हे उद्धव ठाकरेंना माहीतच असणार. किंबहुना तो प्रश्न आल्यास काय उत्तर द्यायचे, याची खुणगाठ उद्धव ठाकरे यांनी आधीपासूनच बांधून ठेवली असणार. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत उद्धव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही दोघे भाऊ निर्णय घ्यायला समर्थ आहोत. त्यावर इतरांनी चर्चा करण्याची गरज नाही. तिसर्याशी या सगळ्यांचा संबंध नाही, असे स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. उद्धव यांची ही ‘राज’नीती म्हणजे महाविकास आघाडीला एकप्रकारे दिलेले उत्तरच म्हणावे लागेल. त्यामुळे आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान राज ठाकरेंसोबतच्या युतीवरून वेगळा निर्णय घेतला, तर आपण स्वतंत्रपणे लढण्यास तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले आहे.