मुंबई : मतांची चोरी करून सत्तेत बसलेल्या चोरांना वाटत होते की, त्यांची चोरी पकडली जाणार नाही. पण ती चोरी आपण चोरांसह पकडली आहे, असे विधान करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. या सर्व चोरांना हद्दपार करण्यासाठी मराठी माणसांसोबत अमराठीदेखील एकत्र आले आहेत. कारण येथे कुणालाच हुकूमशाही नको आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
ऐन दिवाळीत ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला. नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटात प्रवेश केला.
उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मतचोरीवरून भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. आपण शिवसेनेत आलात, पक्षात येण्यासाठी तुम्हाला खोके मिळाले काय, तुमच्या मागे कोणती एजन्सी लागली काय, असा सवाल करत ठाकरे म्हणाले, तुम्ही चांगल्या दिवशी पक्षात आला आहात. आज नरकचतुर्दशी आहे. नरकासुराचा वध करण्यासाठी आपण पक्षात आलेले आहात. नरकासुर कोण ते वेगळे सांगायची गरज नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला टोला लगावला.
दरम्यान, आपण नाशिकमध्ये पुन्हा येईन, अशी मिश्कील टोलेबाजी करत उद्धव ठाकरे म्हणाले, मी नाशिकमध्ये पुन्हा येईन त्यावेळी तुमच्याकडून वचन पाहिजे की, मी येईन तो भगवा फडकवूनच येईन, असे आवाहन करताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
घाबरून पक्षांतर करणारी नेभळट
पक्षफोडीवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून पक्षांतर करणारी नेभळट माणसं आहेत. त्यापेक्षा कट्टर निष्ठावंत शिवसेनेत येत आहेत, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावतानाच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपण कोणते विष पोसतोय त्याकडे नीट डोळे उघडून बघा. आपण इतिहासात या पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.