मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेसोबत युतीची चर्चा सुरू असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकार्यांना सर्वच जागांची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. मनेसेसोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही फक्त तयारीला लागा, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली आहे.
मंगळवारी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरक्षेत्रातील पदाधिकार्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुंबई महानगर परिसरातील 7 महापालिकांच्या परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार या महापालिकांतील पक्षीय बलाबलाची माहिती त्यांनी तेथील पदाधिकार्यांकडून घेतली.
निवडणुकांची घोषणा लवकरच होईल. महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी करा. न्यायालयाच्या निर्णयानुसार नव्या प्रभाग रचनेनुसार ज्या निवडणुका होणार आहेत त्याकडे लक्ष ठेवा. ज्या गोष्टी घडत आहेत त्याकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचना करतानाच मनसेसोबतच्या युतीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल. त्याबद्दलची माहितीदेखील उद्धव ठाकरे यांनी सर्वांना दिली.