Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis
मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा (दि. १६ जुलै) तेरावा दिवस आहे. दरम्यान, आज विधीमंडळात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. विधानपरिषदेत जात असताना दोघांची भेट झाली. त्यानंतर सभागृहात बोलताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंना सत्ताधाऱ्यांसोबत येण्याची थेट ऑफर दिली. यामुळे राजकीय वतुर्ळाच चर्चेला उधाण आले आहे.
उद्धव ठाकरे अंबादास दानवे यांच्या केबिनमधून विधान परिषदेत जात होते. तेव्हा त्यांना पहिल्यांदा अमोल मिटकरी भेटले. यावेळी मिटकरी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले. त्यानंतर डाव्या बाजूकडून मुख्यमंत्री फडणवीस आले. यावेळी ठाकरे आणि फडणवीसांची समोरासमोर भेट झाली. दोघांनीही नमस्कार.... असे म्हटले. त्यानंतर फडणवीस विधान परिषदेत निघून गेले.
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज विधान परिषदेत निरोप समारंभ झाला. यावेळी सभागृहात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, उद्धव ठाकरेंना सत्ताधारी बाकावर येण्याची थेट ऑफरच दिली. ''उद्धवजी २०२९ पर्यंत काहीही स्कोप नाही. आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही. तुम्हाला इथे यायचं असेल तर बघा...स्कोप आहे इथे..आपण वेगळ्या पद्धतीने बोलू,'' असे फडणवीस हसत हसत म्हणाले.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी दानवे यांचे कौतुक केले. ''हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे. भोंग्याविरोधात त्यांनी अनेक निवेदन दिली. ते कट्टर सावरकर आहेत. जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला ते बसले असतील तरीही ते भक्त असतील,'' अशी मिस्किल टिप्पणीही फडणवीस यांनी केली.
अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अनिल परब तुम्ही आता तयारी करा. पुढचा विरोधी पक्षनेता तुम्ही द्या, आम्ही मान्य करू, असेही फडणवीस म्हणाले.
राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान ते विधानसभा निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकवेळा आरोप प्रत्यारोपांचा सामना झाला आहे. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. गडचिरोलीला 'नक्षलवाद्यांचा जिल्हा' याऐवजी गडचिरोलीला 'पोलाद सिटी' म्हणून नवीन ओळख मिळून देण्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाचेदेखील याआधी ठाकरेंच्या शिवसेनेने कौतुक केले होते.