Uddhav Thackeray
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात ५ ते ८ नोव्हेंबर अशा चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर ते जाणार आहेत.
या दौऱ्यात उद्धव ठाकरे थेट अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सरकारने केलेल्या मदतीच्या दाव्यांचा 'फॅक्ट चेक' करणार आहेत, तसेच सरकारी मदतीचे वास्तव जनतेसमोर आणणार आहेत. संभाजीनगरपासून परभणीपर्यंत हा शेतकरी जनसंवाद दौरा असणार आहे.
या चार दिवसांत उद्धव ठाकरे संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ते जवळपास २० ते २५ गावांना भेटी देणार असून, प्रत्येक दिवशी कमीतकमी ५ ते ६ गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर, प्रत्येक दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे जिल्ह्याच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर बैठक घेणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याची अधिकृत घोषणा आणि दौऱ्याचे नाव येत्या २ नोव्हेंबरला जाहीर केले जाणार आहे.