मनसे अध्यक्ष राज ठाकरे.  (file photo)
मुंबई

Shiv Sena MNS alliance : राज ठाकरे यांचे तूर्तास ‘वेट अँड वॉच’

‘टाळी’बाबत सावध भूमिका; मुंबईतील पदाधिकार्‍यांशी चर्चा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर

मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात जाहीरपणे मांडली असली तरी 24 तास उलटल्यानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टाळी दिलेली नाही. एकत्र येण्याच्या उभयपक्षी आणाभाकांच्या प्रतीक्षेत मुंबईकर मराठी मंडळी असली तरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.

शुक्रवारी मनसेच्या मुंबईतील सर्व महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांची बैठक राज ठाकरे यांनी बोलावली होती. मुंबईतील ज्या वॉर्डमध्ये मनसेची वाटचाल समाधानकारक वाटत नाही, अशा ठिकाणच्या प्रमुखांना सक्रिय होण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे तसेच महामुंबईकडे लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेले तीन उपशहराध्यक्ष या वेळी हजर होते. सुमारे 65 वॉर्डांच्या प्रमुखांना या बैठकीला बोलावण्यात आले होते. तेथील परिस्थितीची माहिती घेत जनतेचे प्रश्न आंदोलनासाठी हाती घ्यावेत, असे सांगण्यात आले तसेच पक्षात काही अंतर्गत कुरबुरी आहेत का याचा अंदाजही घेण्यात आला. या बैठकीत युतीसंदर्भातील कोणताही विषय चर्चेलाही आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेना आणि मनसे एकत्र लढण्यासंदर्भात कुणीही कोणतेही विधान करू नये, असे राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत सांगितले आहे. गुरुवारी दसरा मेळाव्यासाठी घरासमोरच्या शिवाजी पार्कवर एकत्र आलेल्या शिवसैनिकांना शर्मिला राज ठाकरे यांनी गच्चीतून हात हलवत शुभेच्छा दिल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी ‘एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी...’ हे वाक्य उच्चारताच शिवसेना उबाठाच्या मेळाव्यात सैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता. मात्र अद्याप राजकीय युतीबद्दल राज ठाकरे यांनी भाष्य केलेले नाही .

उबाठातील एका ज्येष्ठ नेत्याने, मनसे किती जागांची मागणी करते, मुंबईतील गणिते कशी असतील, मनसेची ताकद असलेल्या नाशिक, पुणे अशा महानगरांचे काय,असा अभ्यास करणे सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र युतीबाबत सकारात्मक भावना मनात असल्यानेच उद्धवजी स्वत: शिवतीर्थवर राज यांना भेटायला गेले होते, शेजारचे शिवतीर्थ आपलेच मानायला हवे, असे दसरा मेळाव्यात संजय राऊत यांनी काल जाहीरपणे नमूद केले होते.

मनसेच्या मागणीकडे लक्ष

मनसे कदाचित मुंबईत 100 ते 125 जागांची मागणी करेल. मग काय करायचे, यावरही उबाठात चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला मुंबईतील 100 हून अधिक वॉर्डांत लक्षणीय मते मिळाली आहेत. त्यामुळे मनसेतील एका महत्त्वाच्या नेत्याने किमान 80 जागा आम्ही लढायला हव्यात असे नमूद केले. उबाठा इतक्या जागा देईल का, काँग्रेस समवेत असेल का, अशा प्रश्नांवर सध्या चर्चा सुरू आहे.

टाळीला टाळी देत दोन भावांच्या नेतृत्वातील पक्ष एक आले तर मुंबईतील मराठी माणूस खूश होईल असे मानले जाते. मुंबईत ब्रँड ठाकरेच असे फलक महामार्गांवर दसरा मेळाव्यापूर्वी लावण्यात आले होते. सध्या सतत एकत्र येण्यासंबंधी चर्चा सुरू असल्या तरी एकत्र येण्याबद्दल मनसेने मौनाचे धोरण स्वीकारले आहे.राज यांनी उद्धव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वत: मातोश्रीवर हजेरी लावल्याने टाळीला टाळी मिळेल असे मानले जाते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT