Uddhav Thackeray Pudhari
मुंबई

Uddhav Thackeray: २०१९ पासून थांबलेला फोन पुन्हा सुरू होणार नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

संजय राऊतलिखित ‘बोध कीर्तन’ प्रकाशन समारंभात उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आपणही काही जणांना फोन करत होतो. मात्र, २०१९ पासून काही जणांसोबत थांबलेला फोन आता पुन्हा सुरू होणार नाही, असे म्हणत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर पलटवार केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ नंतर उद्धव ठाकरे यांचा फोन आला नसल्याचे गुरुवारी वक्तव्य केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी हा उपरोधिक टोला लगावला.

दादरला ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात खा. संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी उद्धव बोलत होते.

संजय राऊत यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत उद्धव म्हणाले, मराठी माणसाकडे शब्दांचे सामर्थ्य असायलाच हवे. शब्दांच्या ओव्या कधी म्हणायच्या आणि शिव्या कधी द्यायच्या, हे ज्याला समजते तोच शब्दांची ताकद ओळखतो.

सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत रोज नव्या प्रश्नांवर संघर्ष करावा लागतो. कुठे प्रकल्पासाठी झाडे तोडली जातात, कुठे आंदोलन उभे राहते, तर कुठे अन्यायाविरोधात लढावे लागते. त्यामुळे वाचन आणि चिंतनासाठी वेळच मिळत नाही. समाजाला सतत वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये गुंतवून ठेवले जात असल्याने विचार करण्याची संधी कमी होत चालली आहे, अशी टीकाही उद्धव यांनी केली.

तुरुंगातून लिहू नका

'बोध कीर्तन' या पुस्तकात संजय राऊत यांनी तुरुंगात असताना आलेले अनुभव, मनात निर्माण झालेले विचार आणि त्या काळात जाणवलेल्या विविध गोष्टी मांडल्या आहेत. अशा प्रकारचे पुस्तक तुरुंगात असतानाच निर्माण होऊ शकते. राऊत यांनी यापुढेही अशीच चांगली पुस्तके लिहावीत. मात्र, ही पुस्तके तुरुंगात राहून नव्हे, तर बाहेर राहून लिहावीत, अशी मिश्किल टिप्पणी करत राज यांनी हशा पिकवला.

राज ठाकरे यांनी जयप्रकाश बोधनकर यांचेही नाव घेतले. गँगवॉरच्या बातम्यांपासून सुरू झालेला संजय राऊत यांचा प्रवास आता 'बोध कीर्तन' या पुस्तकापर्यंत पोहोचला आहे. बोधनकरांपासून सुरू झालेला हा प्रवास बोध कीर्तनापर्यंत येईल, असे आपल्याला वाटले नव्हते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT