मुंबई : Maharashtra Politics | मातोश्रीवर दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा गंभीर आरोप विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी केला आहे. त्यावर, अशा गयेगुजरे लोकांकडे मी लक्ष देत नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस नेते किरण काळे यांनी रविवारी मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी नीलम गो-हे यांच्या आरोपाचा समाचार घेतला. ते म्हणाले, महिला नेत्या म्हणून त्यांच्याविषयी मला आदर आहे. त्या स्वतः मर्सिडीजमधून फिरतात. मग लाडक्या बहिणींना पैसे का मिळत नाहीत हे त्या का बघत नाहीत, असा टोलाही ठाकरेंनी लगावला. सोबतच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री धनंजय मुंडे यांना महायुती सरकारने अभय दिल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. या दोन्ही नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच कोकाटे आणि मुंडेंचे रक्षण करणे हे भाजपचे हिंदुत्व आहे काय, असा सवालही त्यांनी केला.