मुंबई

‘धनुष्यबाण’ न वापरता निवडणूक लढवून दाखवा : उद्धव ठाकरे

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू करावा, मग मी आहे आणि तुम्ही आहात; पण नाव चोरायचे नाही, वडील चोरायचे नाहीत, पक्ष चोरायचा नाही. धनुष्यबाण बाजूला ठेवा आणि नवी निशाणी घ्या. हिंमत असेल तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह न वापरता निवडणूक लढवून दाखवा. मिंध्यांच्या वडिलांचा फोटो लावा आणि समोर या, असे थेट आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले.

भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत पक्षाला विजय मिळवून देणार्‍या सर्वांचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाचे श्रेय शिवसैनिकांना दिले. पंतप्रधान मोदी, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार त्यांनी आपल्या भाषणात घेतला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, मराठी सर्वांनी मतदान केले. आता काँग्रेससोबत गेलो म्हणून मी हिंदुत्व सोडल्याचा प्रचार भाजपने सुरू केला आहे; पण मी संविधान आणि देश वाचविण्यासाठी मैदानात उतरलो होतो म्हणून देशभक्तांनी मते दिली. त्यात मुस्लिमांचीही मते होती, असे ठाकरे म्हणाले.

चंद्राबाबू, नितीशकुमार हिंदुत्ववादी आहेत का?

'एनडीए'त सहभागी झालेले चंद्राबाबू आणि नितीशकुमार हे हिंदुत्ववादी आहेत काय, तुम्ही त्यांचा जाहीरनामा बघा आणि तो पूर्ण करण्यासाठी तुम्ही आंध्र प्रदेशात जाणार काय, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. मला हिंदुत्व शिकवू नका. माझे आजोबा आणि वडिलांनी मला भरपूर हिंदुत्व शिकविले आहे, असे त्यांनी भाजपला ठणकावले. आम्ही हिंदुत्व सोडलेले नसून, बुरसटलेले, गोमूत्रधारी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. आम्हाला मंदिरात घंटा बडविणारे नव्हे, तर दहशतवाद्यांना बडविणारे हिंदुत्व पाहिजे. आमचे हिंदुत्व तेजस्वी आणि सुधारणावादी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी भाजपने सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्याची टीका केली.

विधान परिषद निवडणुकीला ठाकरे यांनी घेतला आक्षेप

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला. मिंधे गटाचे आणि राष्ट्रवादीचे आमदार अपात्र होणार असतील, तर विधान परिषदेची निवडणूक होऊ शकते का, अपात्रतेची टांगती तलवार असताना निवडणूक का आणि निवडणुकीची प्रक्रिया कशी सुरू केली? अपात्र आणि गद्दार आमदार मतदान कसे करू शकतात, असे सवाल त्यांनी केले. अपात्रतेच्या निर्णयाला आणखी किती विलंब लावणार, अशी विचारणाही त्यांनी केली. ही वैयक्तिक लढाई नसून, संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

अहंकार आणि आत्मविश्वासात फरक

शिवसेनाप्रमुखांनी मला दोन गोष्टी सांगितल्या, आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपर्‍यात कुठेही जा मरण नाही; पण आत्मविश्वास आणि अहंकारात फरक आहे. मीच करू शकतो हा अहंकार आहे. तो अहंकार मोदींमध्ये आहे, असे ठाकरे म्हणाले. निवडणूक निकालात भाजपला तडाखा बसला आहे; पण विषयांतर करणे त्यांना चांगले जमते. आता त्यांनी उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार, असा अपप्रचार सुरू केला आहे; पण ज्यांनी शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न केले त्यांच्यासोबत पुन्हा जायचे काय, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. आता कोणी तरी उचापती केली की, छगन भुजबळ पुन्हा आपल्याकडे येणार; पण ते आता मंत्री आहेत, त्यांचे वेगळे चालले आहे, आपले वेगळे चालले आहे; मग कशाला हे प्रकार करता, असा संतापही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन परंपरेनुसार सायन येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, अ‍ॅड. अनिल परब, भास्कर जाधव, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह नवनिर्वाचित खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, नगरसेवक आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपल्या एकनिष्ठेचे दर्शन घडवले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित खासदारांचा शाल, पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पराभूत उमेदवारांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

SCROLL FOR NEXT