माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. Pudhari News Network
मुंबई

विकृतांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र बंद : उद्धव ठाकरे

Maharashtra bandh | बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी 'मविआ'चा बंद

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलापूर येथील दोन लहान मुलींवरील अत्याचाराचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी (दि.२४) महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आज (दि.२२) पत्रकार परिषदेत केले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाही, तर विकृतांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी हा बंद आहे. राज्यातील महिला, मुली सुरक्षित राहायला हव्यात. महाराष्ट्रात विकृतीचा व्हायरस पसरला आहे. त्याला कुठे तरी आळा घालण्याची गरज आहे. मुलगी शाळेत सुरक्षित नसेल, तर मग काय उपयोग ? जेव्हा सहनशीलतेचा अंत होतो, तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो. बदलापूरच्या घटनेची सर्वांच्या मनात खदखद आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. आता महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्दये सर्वांनी सहभागी व्हावे.

राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक डोळ्यासमोर जनतेच्या पैशांची उधळपट्टी करून योजना आणल्या जात आहेत. आधी बहिण सुरक्षित करा, मग लाडकी बहिण योजना आणा, असे टीकास्त्र ठाकरे यांनी सरकारवर सोडले. बदलापूर घटनेचा राज्यभर निषेध झाला, तेव्हा मुख्यमंत्री रत्नागिरीत राखी बांधण्यासाठी हात पसरून बसले होते. तेव्हा हातात बांधलेल्या बंधनाला तरी मुख्यमंत्र्यांनी जागावे, असा टोला ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला. राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंमत्र्यांचा फॅशन शो सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT