उद्धव ठाकरे pudhari photo
मुंबई

Uddhav Thackeray : शिवसेना पुन्हा मुंबई ताब्यात घेणारच

उद्धव ठाकरेंचा निर्धार : शिवसेनाप्रमुखांचा ब्रॅन्ड पुसाल तर तुमचे नामोनिशाण महाराष्ट्रातून मिटवू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकांचे नोकर आणि नोकराचे नोकर कामाला लागले आहेत. मुंबई जर मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर यांच्या मालकाच्या मित्राचे काय होणार ही चिंता भाजपला सतावत आहे. पण मुंबई आमचीच आहे. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका ताब्यात घेणारच, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड जर पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तर भाजपाचे नामोनिशाण महाराष्ट्रातून मिटवून टाकू, असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा 59 वा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. वर्धापनदिनासाठी शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पान 1 वरुन... आमदार अनिल परब, सुनील प्रभू तसेच विभागप्रमुख आजी-माजी आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी राज्यासह देशातील राजकारणावर ठाकरे शैलीत चौफेर फटकेबाजी केली. तसेच यावेळी त्यांनी भाजप तसेच शिंदे गटावर निशाणाही साधला.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईला मराठी माणसापासून महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही, असा इशारा देत मनसे सोबतच्या युतीबाबतही त्यांनी भाष्य केले. मागील काही दिवसांपासून बातम्या सुरू आहेत होणार की नाही. मात्र, जे काही व्हायचे आहे ते लवकरच कळेल. जे शिवसैनिकांच्या मनात आहे, जे राज्याच्या मनात आहे, तेच मी करेन असे सांगत त्यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली. तसेच मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडेतिकडे गाठीभेटी घ्यायला लागले आहेत, असा टोलाही उद्धव यांनी राज ठाकरे-फडणवीस भेटीवरून लगावला.

पक्षफोडीच्या राजकारणावर टीका करताना भाजपला पोरे होत नाहीत त्याला आम्ही काय करणार असे ठाकरे म्हणाले. भाजपला स्वत:ची पोरे नाहीत म्हणून त्यांना अशी घ्यावी लागतात. किती पाहिजे तेवढी पोरे घ्या, असे आव्हान त्यांनी दिले. एवढी माणसे चोरली, पक्ष चोरला, वडील चोरले तरी उद्धव ठाकरे संपत कसा नाही, असा प्रश्न त्यांना पडला आहे. शिवसेनाप्रमुखांनी, शविसैनिकांनी रक्त आटवून शिवसेना नावाचे वादळ निर्माण केले आहे. पैसे फेकून जमवलेली ही माणसे नाही. कट्टर हिंदुत्वनिष्ठ, महाराष्ट्रधर्म पाळणारे हे शिवसैनिक आहेत, असे सांगत आज दुसरीकडे चोरांचा बाजार सुरु आहे, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लागावला.

अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन या...

मला आणि शिवसेनेला संपवायचा भाजप प्रयत करत आहे, असे सांगत उद्धव ठाकरेंनी प्रहार व त्रिशूल चित्रपटातील डायलॉगची आठवण करून दिली. मी या गद्दारांसमोर उभा आहे, मी म्हणतोय... कम ऑन किल मी, हिंमत असेल तर अंगावर या. पण अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा, अमिताभच्या चित्रपटात तो अ‍ॅम्बुलन्स घेऊन येतो तशी अ‍ॅम्बुलन्स घेऊनच या. कारण तुम्ही पायावर चालत जाणार नाही, तर जाताना आडवे होऊन स्ट्रेचरवर जाल, असा इशारा त्यांनी दिला. तुम्ही शिवसेना संपविण्याची कितीही स्वप्ने बघा, पण तुमच्या छाताडावर पाय ठेवला नाही तर बघा, असे थेट आव्हान ठाकरेंनी दिले.

देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज

भाजपचे केंद्रात सरकार आल्यानंतर पनवती लागली आहे. प्रयागराजला, दिल्लीला माणसे चेंगरून मेली. विमान अपघातात लोक मेली, पण जबाबदारी घ्यायला कोणी नाही, असे सांगतानाच आज देशाला पंतप्रधानाची गरज आहे, कारण देशाचे सैन्य पाकिस्तानसोबत युद्ध करत असताना ट्रम्प यांचा फोन आल्यानंतर यांचा आवाज गेला. त्यामुळे आताचे पंतप्रधान हे फक्त भाजपपूरते आहेत. पहलगाममध्ये अतिरेकी आले कसे? हल्ला झाल्यानंतर ते पाकिस्तानात गेले की पाताळात गेले की भाजपमध्ये गेले. त्यामुळे देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, पक्ष फोडणार्‍या अमित शहांची नाही. देशाला आणि राज्याला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे. गुंडांना संरक्षण देणार्‍या राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही, असा टोलाही ठाकरेंनी लगावला. भाजपने आता केवळ दाऊदला पक्षात घ्यायचे राहिले आहे. आधी भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, चौकश्या लावायच्या, जिणे हराम करायचे आणि नंतर पक्षात प्रवेश द्यायचा. भाजपने आता तुरुंगाबाहेरच सदस्य नोंदणीसाठी टेबल लावले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

निवडणुकीच्या तोंडावर हिंदी सक्तीचा वाद

हिंदी सक्ती करण्याची गरज काय, असा सवाल करताना हिंदीला आमचा विरोध नाही, पण हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. हिंदी सक्ती करायची तर तामिळनाडू आणि गुजरातमध्ये का करत नाही, असा सवाल त्यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर मराठी आणि अमराठीमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम भाजपने केला. लोकांमध्ये भांडण लावून हे भ्रष्टाचार करायला मोकळे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

जे राज्याच्या मनात, जे शिवसैनिकांच्या मनात, तेच मी करणार, पण मुंबईत मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून हे प्रयत्न करत आहेत, हॉटेलमध्ये भेटी घेत आहेत. मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात पुन्हा गेली तर यांच्या मालकांचे काय होणार?
उद्धव ठाकरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT