Uddhav Raj Thackeray Meeting Keshav Upadhye Tweet :
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आगामी दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं. दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दृष्टीकोणातून हे महत्वाचं पाऊल असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं ठाकरे ब्रँड एकीकरणामुळं राज्यातील राजकारणातील काही समीकरणं देखील बदलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर एक खोचक ट्विट केलं आहे. त्यांनी 'बिनशर्ट, बिनशर्ट म्हणता म्हणता त्यालाच बिनशर्त तीनदा भेटले….केवळ आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी आता मशालीला इंजिनाचे वंगण फासले…' असं ट्विट केलं.
यापूर्वी ज्यावेळी राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी बिनशर्ट हा शब्द वापरला होता. केशव उपाध्ये यांनी हाच धागा पकडून खोटक ट्विट केलं.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर काँग्रेसमध्ये देखील जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसच्या वाट्याला जागा कमी येतील. त्यामुळं काँग्रेसनं वेगळं लढण्याचा सूर आवळला आहे. दरम्यान, शिवसेना आणि मनसे राष्ट्रवादी काँग्रेसला देखील सोबत घेण्याबाबत विचार करत आहेत अशी माहिती समोर येत आहे.