मुंबई: जेन झी आंदोलनामुळे संजीवनी मिळालेल्या उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांनी आता २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी संघटना मजबूत करण्याचे ठरवले आहे. यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सप्टेंबरनंतर राज्याचा दौरा करणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आलेले राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू आता २०२९ च्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. जेन झी आंदोलनाला पाठिंबा देऊन ठाकरे बंधूंनी योग्य संधी साधली. त्यामुळे त्यांच्या शिडात हवा भरली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर शिवसेनेचे बहुतांश आमदार आणि खासदार हे त्यांच्यासोबत गेले. तसेच २०२४ मध्ये निवडून आलेले ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे यांनी फोडले.
त्यामुळे कोकणासह राज्यातील सर्वच भागांतील अनेक नेते आणि पदाधिकारी शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे पुन्हा संघटना बांधणीचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख अशा नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
मनसेची मुंबई, पुणे, नाशिकमध्ये चांगली ताकद आहे. त्यामुळे तेथील संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या काही बैठका झाल्या आहेत. या बैठकींना आदित्य आणि अमित ठाकरे उपस्थित होते.