Ganesh Chaturthi 2025 Uddhav Thackeray Raj Thackeray file photo
मुंबई

Mumbai Mayor Election | ठाकरे बंधूंचे एकमत! मुंबई, ठाणेसह 5 महापालिकांची निवडणूक शिवसेना (उबाठा), मनसे एकत्र लढणार

Mumbai Mayor Election | संजय राऊत : मातोश्रीवरील भेटीत ठाकरे गट-मनसेमध्ये एकमत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे या पक्षांमध्ये मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक महापालिकेची निवडणूक एकत्र लढण्याबाबत एकमत झाले आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी दिली. काही भागात मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असून कुठे, कोणाची मदत घेता येईल, या गोष्टींचा विचार दोन्ही भाऊ करीत असल्याचेही राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.

रविवारी वांद्रे येथील एका कार्यक्रमात उद्धव व राज ठाकरे एकत्र दिसले. त्यानंतर दुपारी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. ती राजकीय भेट होती, असे सांगतानाच राऊत म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्रात 29 महापालिका आहेत.

प्रत्येक जागेवर, पॅनेलवर चर्चा व्हायला हवी. प्रत्येक महापालिकेची परिस्थिती वेगळी आहे. या सगळ्यांवर चर्चा होत आहे. प्रत्येक महापालिकेवर दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते चर्चा करीत असून या चर्चाचा अंतिम टप्पा गाठला आहे, असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांचे व्यक्तिगत आणि राजकीय नाते घट्ट झाले आहे.

कोणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले तरी आता प्रकरण फार पुढे गेले आहे. आता माघारीचे दोर नाहीत. त्यामुळे कुणी कुठल्या मेळाव्यात काय वक्तव्य केले तरी त्यांच्या छाताडावर पाय ठेवून ठाकरे बंधू उभे राहायच्या मनः स्थितीत आहेत, असे राऊत म्हणाले.

ठाकरे बंधूंचाच होणार मुंबईचा महापौर मुंबईचा महापौर हा मराठी आणि मराठी बाण्याचा होईल, तो अस्सल भगव्या रक्ताचा असेल, म्हणजेच ठाकरे बंधूंचाच महापौर होईल, असे राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मराठी बाण्याचे म्हणजे भाजप किंवा मिधे सांगतात तसे नाहीत. दिल्लीचे जोडे उचलणारा माणूस मुंबईचा महापौर होणार नाही, असा चिमटा राऊत यांनी काढला.

मविआचे काय ?

महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत हे राज ठाकरेंना सांगण्याचा अधिकार माझा एकट्याचा नाही. महाविकास आघाडी एका पक्षाची बनलेली नाही. त्यामध्ये तीन पक्ष आहेत. मनसे हा स्वतंत्र बाण्याचा पक्ष आहे. पण याक्षणी शिवसेना आणि मनसे यांच्यात चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे मविआशी उत्तम संबंध आहेत आणि आघाडीच्या नेत्यांचे राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT