मुंबई: कोल्हापूरसाठी आयटी पार्क मंजूर करण्यात आले आहे. मात्र, कागल एमआयडीसीमधील जागा संपली असून या पार्कसाठी कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणार्या मार्गावर जागेचा आम्ही शोध घेत आहोत. येत्या चार महिन्यांत जमीन निश्चित केली जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी केली. ‘पुढारी न्यूज’च्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईच्या वरळी येथील एनएससीआय सभागृहात आयोजित ‘पुढारी न्यूज महासमिट :2025’मध्ये ते बोलत होते. ‘पुढारी न्यूज’चे संपादक प्रसन्न जोशी यांनी मंत्री सामंत यांना अनेक विषयांवर बोलते केले.
राज्यात आलेल्या गुंतवणुकीचा मंत्री उदय सामंत यांनी यावेळी आढावा घेतला. ते म्हणाले, आम्हाला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनची करायची आहे. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर उद्योजकांचा राज्यात गुंतवणूक करण्याचा कल वाढला असून, देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी 40 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
महायुतीचे सरकार आल्यानंतर आम्ही राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दावोस परिषदेत तब्बल 15 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही असाच प्रतिसाद मिळाला होता. आम्ही केवळ करारच केले नाहीत तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. त्यामुळे महाराष्ट्र हा पुन्हा उद्योगात नंबर वन झाला आहे, असा दावा मंत्री सामंत यांनी केला.
राज्यातील अनेक भागांमध्ये गुंतवणूकदार येत आहेत, असे असताना विरोधक येथील उद्योग बाहेर जात असल्याचा बेछूट आरोप करत आहेत. यातील सत्य जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमांनीच समिती स्थापन करून सत्य बाहेर आणावे. गुजरातमध्ये एकही उद्योग गेलेला नाही. तरीसुद्धा विरोधक महाराष्ट्रातील उद्योग तिकडे जात असल्याचे आरोप करत आहेत. उलट गुजरातमधूनच वस्त्रोद्योग महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यात आले आहेत. मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी उद्योग सुरतला गेला, असे बोलले जात आहे.
प्रत्यक्षात मालकच त्या भागातील असल्यामुळे त्यांनी एक शाखा तिथे सुरू केले होती. आता ती शाखाही बंद करून ते नवी मुंबईला हलवत आहेत. नवी मुंबईत किमान 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. पुण्यातूनही उद्योग बाहेर गेल्याचे ढोल विरोधक पिटत आहेत. वास्तविक हिंजवडीमध्ये नवीन सहा रस्ते सुरू झाले की, येथे आणखी उद्योग येतील. पुण्यात ह्युंडाईचा उद्योग आणण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले. त्यांची इच्छाशक्ती पाहून कंपनीने सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. पण अशा सकारात्मक बाबींकडे विरोधक पाहात नाहीत. निवडणुका आल्या की केवळ मराठीचा मुद्दा करून विरोधक लोकांची मने दूषित करत आहेत, असा आरोप मंत्री सामंत यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रात उद्योगासाठी पोषक वातावरण आहे. त्यासाठी उद्योगपतींना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देणे गरजेचे असते. मात्र त्याऐवजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराखाली उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात जिलेटिन ठेवण्यात आले हे बरोबर आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रात उद्योगधंदे येण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. पण विरोधक प्रत्येक ठिकाणी राजकारण आणतात. विरोधकांनी बेरोजगारी हटविण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी राजकारण आणू नये, असे आवाहन त्यांनी केले. विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे नाणार रिफायनरी आली नाही. आता बारसूलाही विरोध केला जात आहे. एखादा उद्योजक भेटला नाही तर त्याच्या विरोधात बोलणे योग्य नाही. विकासाच्या दृष्टीने विरोधकांची ही भूमिका कोणालाही पटणार नाही, अशी टीका सामंत यांनी केली.
दावोसमध्ये अंबानी यांनी तीन लाख कोटी रुपयांचा करार केलेला आहे. मात्र, अदानी यांनी गुंतवणूक केली की, विरोधक टीका करतात. विरोधकांनी मैदानात उतरून जरूर टीका करावी. पण उद्योगात राजकारण करू नये, असा टोला हाणत मंत्री सामंत म्हणाले, राज्यातील एमआयडीसी बिल्डरांसाठी कुरण बनत चालली असल्याचा आरोप केला जात आहे. परंतु त्यात काही तथ्य नाही. नाशिक एमआयडीसीमधील अतिक्रमणे हटविण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आम्ही कोणालाही आरक्षण बदलून जमिनी दिल्या नाहीत. पुढील सात दिवसांत आम्ही एमआयडीसीच्या जमिनीबाबत अॅप आणत आहोत. तसेच एखाद्या फाईलबाबतची माहिती मिळण्यासाठी ट्रॅकिंग सिस्टीमसुद्धा आणली आहे.
महायुतीमधील अंतर्गत राजकारणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वार्या वाढल्याची टीका केली जात आहे. याबाबत विचारले असता त्यांनी महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्य नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना ते महाराष्ट्राच्या हितासाठी भेटत असतात. त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून ते दिल्लीत बसतात. दिल्लीत त्यांना सन्मान आहे. पण कोणाला तरी सहाव्या रांगेत बसवले जात जात आहे. अशा लोकांना शिंदे यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, असा पलटवार सामंत यांनी केला.
बोलताना भान ठेवा
मागील 25 वर्षांपासून मी राजकारणात आहे. माझ्या घरातील एकही व्यक्ती यापूर्वी राजकारणात नव्हती. त्यामुळे एखादी चूक झाल्यास मला घरी बसावे लागेल, याची मला जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे मी आतापर्यंत केवळ समाजकारणालाच महत्त्व देत आलो आहे. मी कधीही कोणावर विनाकारण टीका करत नाही की अपशब्द वापरत नाही. त्यामुळे मागील पाच टर्म मी आमदार आहे. लोक मला निवडून देतात. सर्वांनी बोलताना भान ठेवायला हवे, असे सांगतानाच शिवसेना मंत्र्यांना बदनाम करून एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ठाकरे बंधू एकत्र येणे राजकारणाचा विषय नाही
ठाकरे बंधूंनी एकत्र यावे तसे पवार कुटुंबीयांनी एकत्र यावे असे मी यापूर्वीही बोललो होतो. हा काही राजकारणाचा विषय नाही. राजकारणाचा विषय म्हणाल तर परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करतात. अशा नेत्यांबरोबर आपण बोलणार आहात का, हे त्यांना विचारावे लागेल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप लांब आहेत. तिकीट वाटप झाल्यावर आपण ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्याविषयी बोलू, असे त्यांनी सांगितले.
राज्याच्या राजकारणाला एक संस्कृती आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी दाखवलेला मार्ग आमच्यासारख्या राजकारण्यांना मार्गदर्शक आहे. मागील आठवड्यात मी शरद पवार यांना भेटलो होतो. तसा यापूर्वी अनेक नेत्यांना भेटलो आहे. त्यात काहीही चुकीचे नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्याचा औद्योगिक विकास वेगाने
राज्यात गेल्या तीन वर्षांत औद्योगिक प्रगती सुरू आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणखी औद्योगिक विकास करायचा आहे. प्रत्येक जिल्ह्यात समतोल औद्योगिक विकास केल्यास बेरोजगारी दूर होईल. गडचिरोली सारख्या भागात यापूर्वी कोणी काम करण्यास तयार नव्हते, अशा ठिकाणी आता प्रकल्प सुरू होत आहेत. तेथे स्टील हब हा एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प येत आहे. कोकणचाही विकास होत असल्याचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अहवाल सांगत आहे. त्यामुळे राज्य प्रगतीपथावर असल्याचे सिद्ध झाले आहे. केंद्रीय नीती आयोगाचाही आमच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन आहे. आम्ही योग्य दिशेने कामकाज करत असल्याचे सिद्ध झाले आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.
गुजरातमध्ये एकही उद्योग गेलेला नाही. उलट गुजरातमधूनच वस्त्रोद्योग महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यात आले आहेत. मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी उद्योग सुरतला गेला म्हणतात. प्रत्यक्षात मालकच त्या भागातील असल्यामुळे त्यांनी एक शाखा तिथे सुरू केली होती. आता ती शाखाही बंद करून ते नवी मुंबईला हलवत आहेत. !उद्योगमंत्री उदय सामंत