मुंबई : अंधेरीतील सेक्स रॅकेटप्रकरणी नवी मुंबईतील दोन महिला दलालांना गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटने अटक केली असून तीन तरुणींची सुटका केली आहे. त्यात नवी मुंबईतील एका कॉलेज तरुणीचा समावेश आहे. अटकेनंतर सर्वांना ओशिवरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या माध्यमातून अनामिका या महिलेस फोन करून तिच्याकडे दोन तरुणींची मागणी केली, तसेच व्हॉटअपवर तरुणींचे फोटो पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार तिने दोन तरुणींचे फोटो पाठवून प्रत्येक तरुणीमागे 15 हजाराचा मोबदला मागितला. सर्व व्यवहार ठरल्यानंतर तिने त्याला अंधेरीतील लोखंडवाला, बँक रोडवर बोलावले. 26 ऑगस्टला हा बोगस ग्राहक तिथे गेला होता. यावेळी अनामिकासोबत तिची एक सहकारी प्रिती आली होती. त्यांच्यासोबत तीन तरुणी होत्या. त्यांच्यात आर्थिक व्यवहार सुरु असताना वांद्रे युनिटच्या अधिकार्यांनी छापा टाकून दोन्ही महिलांना अटक केली. तपासात दोघीही नवी मुंबईतील असल्याचे उघड झाले. कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून एकजण ही नवी मुंबईतील एका नामांकित कॉलेजची विद्यार्थिनी आहे.