Mumbai terror arrest | मुंबईत इसिस, ‘जैश’चे दोन दहशतवादी ताब्यात Pudhari file Photo
मुंबई

Mumbai terror arrest | मुंबईत इसिस, ‘जैश’चे दोन दहशतवादी ताब्यात

तरुणांचे ब्रेन वॉशिंग करत असल्याचा संशय : एटीएस-दिल्ली पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कुर्ला : इसिस आणि जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या दोन संशयित तरुणांना कुर्ला आणि खडवली परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली असून या दोघांकडून अधिकार्‍यांनी मोबाईल फोन, लॅपटॉप आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत.

पाकिस्तानमधील इसिस आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या काही सदस्यांना काही महिन्यांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ओडिशा येथून अटक केली होती. यावेळी या संशयितांचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिस आणि एटीएसने गोवंडी परिसरात देखील छापे घालत एकाला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती आले होते. यातूनच रविवारी पुन्हा एकदा दिल्ली पोलिस आणि महाराष्ट्र एटीएस यांनी कुर्ला पश्चिम आणि खडवली येथे छापे घातले. यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले.

या दोघांनी अनेक तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होऊन दहशतवादी कारवाया कराव्यात यासाठीही ब्रेन वॉशिंग केल्याचा संशय आहे. गोवंडी परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरुणाच्या चौकशीतूनच ही माहिती समोर आली होती. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. हे दोन्ही संशयित तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील होणार्‍या तरुणांचे ऑनलाईन ब्रेन वॉशिंग करण्यासाठी समाजमाध्यम आणि एनक्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करत असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे. त्यानुसार अधिक चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दिल्ली येथे नेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT