ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या. (Image source- Baba Siddique X account)
मुंबई

बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँग?; शूटर्सना ॲडव्हान्स पेमेंट, दीड महिना रेकी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अलिकडेच काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात दाखल झालेले ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी (Baba Siddique murder news) यांची शनिवारी रात्री वांद्र्यात खेरवाडी सिग्नलवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोन परप्रांतीय शूटर्सना पोलिसांनी अटक केली असून एका बड्या गँगस्टर्सने सिद्दीकींच्या हत्येची सुपारी दिली असावी असा संशय आहे.

दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी ते लॉरेन्स बिश्नोई गँगशी (Lawrence Bishnoi gang) संबंधित असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच आरोपींना हे कृत्य करण्यासाठी ॲडव्हान्समध्ये पैसे देण्यात आले होते आणि काही दिवसांपूर्वी त्यांना शस्त्रे पुरविण्यात आली होती, असे तपासात आढळून आले आहे.

गुरमेल बलजीत सिंग (वय २३, हरियाणा) आणि धर्मराज राजेश कश्यप (९, उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी चौकशीदरम्यान, ते कुख्यात गँगस्टर्स लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील असल्याचे म्हटले आहे, अशी मागिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर झालेल्या गोळीबारात बिश्नोई गँगचा हात होता. याच गँगने बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्याचा संशय आहे.

आरोपींनी महिनाभर केली होती परिसराची रेकी

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी हत्या घडवून आणण्यासाठी गेली दीड ते दोन महिन्यापासून या परिसराची रेकी केली होती, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

Baba Siddique shot dead : नेमकं काय घडलं?

मुंबईत दोन्ही शिवसेनेंचे दसरा मेळावे सुरू असतानाच बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच हा भयंकर प्रकार घडला. अकस्मात अवतरलेल्या तिघा मारेकऱ्यांनी अत्यंत जवळून चार ते पाच राऊंड फायर केले आणि हल्लेखोर पसार झाले. त्यापैकी दोन शुटर्सना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

दोघे शूटर्स हरियाणा आणि उत्तर प्रदे-शातील असून या हत्येमध्ये एका बड्या गँगस्टर्सचा हात असावा या प्राथमिक निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत. हा बडा गँगस्टर म्हणजे कुख्यात लॉरेन्स बिष्णोई असू शकतो, असे म्हटले जात असतानाच एसआरए प्रकल्पातील वादाकडेही बोट दाखवले जात आहे.

तीन वेळा वांद्रे मतदारसंघातूनच आमदार

बाबा सिद्दिकी वांद्रे परिसरातच राहत. ते काँग्रेसकडून १९९०, २००४, २००९ साली सलग तीन वेळा वांद्रे विधानसभा मतदारसंघातूनच आमदार म्हणून निवडून आले होते. २००४ साली त्यांना राज्यमंत्रीही करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी नाराज होवून ते १२ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अजित गटात दाखल झाले होते. त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांचे वांद्र्यातील निर्मलनगर, खेरवाडी जंक्शन परिसरात कार्यालय आहे. तिथे बाबा सिद्दीकी हे नियमित जात. शनिवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे तिथे गेले होते. रात्री सव्वानऊ वाजता ते कार्यालयाबाहेर फटाके फोडत असतानाच तिथे आलेल्या तिघा शूटर्सनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या छातीत लागून ते जागीच कोसळले. रक्तबंबाळ बाबा सिद्दीकी यांना जवळच्या लीलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असता उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

१५ दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी

१५ दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी आली होती. विशेष म्हणजे त्याआधीपासूनच सिद्दीकींना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तेव्हापासून सिद्दीकी या सुरक्षेसह वावरत असत. ही सुरक्षा भेदून हल्लेखोर त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे सिद्दीकींचा गेम केल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT