मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव महानगरपालिकेतील काँग्रेसच्या महापौरांसह 28 नगरसेवकांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मालेगावमध्ये मोठी सभा घेणार असल्याचे सुतोवाच जयंत पाटील यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली मालेगावचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम करु, असाही विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री म्हणाले, अल्पसंख्याक समाजामध्ये शिक्षण कमी आहे, त्यामुळे या समाजाला शिक्षणात प्रगती करण्यासाठी मालेगावमध्ये काय सुविधा उभारता येतील. तसेच मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळाच्या माध्यमातून काय योजना आखता येतील, याचा विचार आम्ही नक्कीच करु. तसेच हे आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी पुन्हा एकदा चांगला निधी मालेगावला देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मालेगावमधील कब्रस्तानशी निगडीत प्रश्न लवकर सोडवू तसेच नवीन पॉलिटेकनिकल महाविद्यालय लवकरच उभारू, असे आश्वासनही दिले.