Tushar Kapoor Extortion Threat Pudhari
मुंबई

Tushar Kapoor Extortion Threat: तुषार कपूर यांना बिश्नोई टोळीच्या नावाने ५ कोटींची खंडणी मागितली

धमकीच्या ऑडिओमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या नमुन्याशी जुळला नाही; टोळीच्या नावाचा गैरवापर झाल्याचा पोलिसांना संशय

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अभिनेता तुषार कपूर यांच्याकडे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगून पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख हॅरी बॉक्सर अशी करून दिली होती.

मात्र, मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात धमकीच्या ऑडिओमधील आवाज आणि हॅरी बॉक्सरच्या उपलब्ध आवाजाच्या नमुन्यात साम्य आढळलेले नाही. त्यामुळे बिश्नोई टोळीचा या धमकीमागे प्रत्यक्ष हात नसून या टोळीच्या नावाचा वापर करून खंडणी मागण्याचा प्रयत्न झाला असावा.

तुषार कपूरने धमकीची माहिती मुंबई पोलिसांना दिल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे देण्यात आला.

बिश्नोई टोळीचे नाव सांगून अभिनेत्याला घाबरवायचे आणि त्याच्याकडून मोठी रक्कम उकळायची, असा प्रयत्न झाल्याचा पोलिसांना संशय आहे. धमकीचा ऑडिओ कोणी पाठवला, त्यासाठी कोणत्या मोबाईल क्रमांकाचा वापर झाला आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

अभिनेता टायगर श्रॉफवर जुहूमध्ये १८ ऑक्टोबर रोजी गोळीबार झाला. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या अमित पंडितने स्वीकारली. त्यानंतर काही दिवसांतच तुषार कपूरला खंडणीची धमकी आल्याने चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT