मुंबई : अग्निशमन दलासाठी 68 मीटर उंच टर्नटेबल शिडी खरेदीसाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत महापालिकेने एका कंपनीच्या फायद्यासाठी निकष बदलून अन्य कंपन्यांना प्रक्रियेतून दूर ठेवल्याचा आरोप होत आहे. या खरेदीत करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे.
मुंबई अग्निशमन दलाने 68 मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या टर्नटेबल शिडीच्या खरेदीसाठी एकाधिकार निविदा जारी केली आहे. या शिडीचे उत्पादन जगातील एकमेव मॅजिरस जीएमबीएच कंपनीने केले आहे. वर्षभरापूर्वी या कंपनीला एकाधिकार निविदा बोलावून त्यांच्याकडून टर्नटेबल शिडी खरेदी करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच मुंबई महानगरपालिकेने टर्नटेबल शिडीचे उत्पादन करणार्या कंपनींना 64 मीटर टर्नटेबल शिडीसह त्याहून अधिक उंचीचे शिडी खरेदी करण्यासाठी निविदेत सहभागी होण्याची परवानगी दिली. मात्र यावेळी केवळ मॅजिरस जीएमबीएच कंपनीच्या फायद्यासाठी निकष बदलून अन्य कंपनींना निविदा प्रक्रियेतून दूर ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मॅजिरस जीएमबीएच या कंपनीने एक 68 मीटर टर्नटेबल शिडी 11 कोटी रुपयाला देण्याची तयारी दर्शवली होती. आता शिडीची किंमत 7 कोटी रुपयांनी वाढवून 18 कोटी रुपये इतकी केली.
मॅजिरस जीएमबीएच या कंपनीकडून एका शिडीची किंमत 11 कोटी निश्चित केली होती. त्यानुसार चार शिड्यांसाठी 44 कोटी रुपये खर्च आला असता. पण हा खर्च 72 आता कोटींवर पोहचला आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे तब्बल 28 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. स्पर्धात्मक निविदा झाली असती तर 44 कोटी रुपयांपेक्षा कमी खर्चात शिडी खरेदी करणे शक्य झाले असते, असे काही पालिकेच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे.