मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे नॅशनल पार्कमधील तुळशी व विहार तलाव अजूनही रिकामेच आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत तलाव पाणलोट क्षेत्रात निम्माही पाऊस झालेला नाही. त्यामुळे हे तलाव यंदा 72 ते 85 टक्के इतकेच भरले आहेत.
2024 मध्ये विहार तलावाच्या पाणलोट क्षेत्रात 5 ऑगस्टपर्यंत 2,658 मिमी इतका पाऊस झाला होता. यंदा 1,214 मिमी पाऊस झाला आहे. तुळशी तलावाच्या पाणलोट क्षेत्रातही 5 ऑगस्ट 2024 पर्यंत 3,212 मिमी इतका पाऊस झाला होता. यावेळी 2,124 मिमी इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे तलाव अद्याप भरलेले नाहीत.
मात्र, मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे ठाणे व नाशिक जिल्ह्यांतील तलावांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा तलाव ओसंडून वाहत आहेत. भातसा व अप्पर वैतरणा तलावांतील पाणीसाठाही वाढला आहे. भातसा तलावाच्या पाणलोटक्षेत्रात 266 मिमी कमी पाऊस झाला आहे. अन्य तलाव पाणलोट क्षेत्रातही गेल्या वर्षीपेक्षा 100 ते 200 मिमी अधिक कमी पाऊस झाला. त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.