मुंबई

विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने विधानसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाची संधी चालून आली आहे. ज्येष्ठ नेत्यांऐवजी दुसर्‍या फळीतील नेत्याला संधी देण्याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू असून त्यामध्ये आमदार संग्राम थोपटे, माजी मंत्री सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांची नावे आघाडीवर आहेत. आपल्याला विरोधी पक्षनेतेपद मिळावे म्हणून थोपटे यांनी आमदारांच्या सह्यांची मोहीम चालू केल्याने दावेदार सावध झाले असून त्यांनी पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रारी केल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून सत्तेत सामील झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद आता काँग्रेसकडे जाऊ शकते. विरोधी पक्षात आता सर्वाधिक आमदार असल्याने काँग्रेसला संधी चालून आली आहे. येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणूक असल्याने नव्या दमाच्या नेत्याला काँग्रेस संधी देणार असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये आमदार संग्राम थोपटे, सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांची नावे आघाडीवर आहेत.

संग्राम थोपटे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी देखील चर्चेत होते. मात्र, त्यापूर्वीच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. आता आपल्याला विरोधी पक्षनेतेपदाची संधी तरी मिळावी, अशी थोपटे यांना अपेक्षा आहे. त्यांनी त्यासाठी काही आमदारांच्या सह्या देखील घेतल्या आहेत. विदर्भातील आमदार सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्षपद नाना पटोले यांच्या रूपाने विदर्भात दिले असताना विरोधी पक्षनेतेपद विदर्भात देण्याची शक्यता कमी असल्याने संग्राम थोपटे यांना जास्त संधी असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे.

विधान परिषदेतही राष्ट्रवादी आमदारांत फूट

मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीचे पडसाद सोमवारी विधान परिषदेतही पाहायला मिळाले. दोन्ही पक्षांतील काही आमदारांनी सत्ताधारी बाकांवर बसण्याची विनंती केल्याची माहिती उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच दिली. तसेच त्यांना तशी परवानगी देण्यात आल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, अरुण लाड हे विरोधी बाकावरच बसले. तर रामराजे निंबाळकर, विक्रम काळे, अनिकेत तटकरे, अमोल मिटकरी, सतीश चव्हाण हे सत्ताधारी बाकावर बसले. तसेच शिवसेना आमदार मनीषा कायंदे याही सत्ताधारी बाकावर बसल्या. दरम्यान, एकनाथ खडसे, बाबा जानी दुर्राणी हे आमदार सभागृहात उपस्थित नव्हते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT