मुंबई ः राज्याचे परिवहनमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक टेस्ला कंपनीचे भारतातील पहिले ग्राहक ठरले आहेत. शुक्रवारी सरनाईक यांना कारचे मॉडेल वाय हस्तांतरित करण्यात आले.
सरनाईक यांनी एक्स या समाजमाध्यमावर कार स्वीकारतानाची काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. समाजात आणि विशेषतः युवकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबाबत जागृती करण्यासाठी मॉडेल वाय खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही कार मी माझ्या नातवाला प्रतीकात्मक भेट म्हणून देत असल्याचा उल्लेखही त्यांनी पोस्टमध्ये केला आहे.
टेस्लाचे आगमन भारतात होणार, याबाबत खूप उत्सुकता दाखवली जात होती. मात्र, कारच्या बुकिंगमधून विपरीत चित्र दिसत आहे. जुलैच्या मध्यावधीपासून बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या 600 कारसाठी मागणी नोंदवली गेली आहे.
टेस्लाच्या कार विक्रीचा जागतिक आकडा वेगळा आहे. इतक्या कार तर काही तासांत विकल्या जातात, असे वृत्त 2 सप्टेंबर रोजी ‘ब्लूमबर्ग’ने दिले आहे. टेस्ला यावर्षी 350 ते 500 वाहने वितरीत करणार आहे. चीनमधील शांघाय येथून या महिन्यात कारची पहिली खेप येईल. कंपनी मुंबई, दिल्ली, पुणे आणि गुरुग्राम या ठरावीक ठिकाणीच सुरुवातीला वाहनांची विक्री करणार आहे.
टेस्लाने यावर्षीचा अडीच हजार वाहनांचा कोटा पूर्ण करण्याचे ठरवले होते. मात्र, आयातशुल्कामुळे टेस्लाचे सर्वात कमी किंमत असलेले मॉडेल वाय 60 लाखांवर गेले आहे. देशातील इलेक्ट्रिक वाहनांची सरासरी किंमत 22 लाख रुपये आहे. भारत-अमेरिका टॅरिफ तणावामुळे शुल्क सवलत मिळवण्याची टेस्लाची आशा मावळली आहे, तर शोरूममधून मोठी विक्री होईल, असे चित्र सध्या दिसत नाही. त्यानंतरही टेस्लाने मुंबई आणि दिल्लीमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास सुरुवात केली आहे.