Mumbai High Court
मुंबई हायकोर्टाच्या इमारतीसाठी जमिनीचे हस्तांतरण सप्टेंबरपर्यंत Pudhari News Network
मुंबई

मुंबई हायकोर्टाच्या इमारतीसाठी जमिनीचे हस्तांतरण सप्टेंबरपर्यंत

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाची नवी इमारत पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे वांद्र्यातच उभारली जाईल आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरातील ४.३९ एकर जागा यासाठी सुपूर्द केली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सोमवारी दिली. येत्या १० सप्टेंबरपर्यंत ही जमीन सुपूर्द केली जाईल.

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर, मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारती आणि अतिरिक्त जमीन वाटपप्रकरणी याचिकेवर सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी जमीनप्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे अधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली. तसेच उर्वरित ३०.४६ एकर जमीनही विहित वेळेत उच्च न्यायालयाकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहितीही न्यायालयाला देण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचा आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने ८ वास्तुविशारदांची निवड केली असल्याचे न्यायालयाने नमूद केले. हे ८ वास्तुविशारद उच्च न्यायालयाच्या समितीसमोर बांधकाम आराखड्याचे सादरीकरण करतील.

SCROLL FOR NEXT