नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानकानजीक रेल्वे ट्रॅकवर उड्डाणपुलाच्या कामासाठी लॉन्च गर्डर टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम सुरु असताना शुक्रवारी (ता.9) सकाळच्या सुमारास गर्डर काही अंशी झुकल्याने ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा थांबवण्यात आली. यावेळी ठाणे रेल्वे स्थानकासह ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी कामावर निघालेले चाकरमानी आणि बाहेर जाणार्या नागरिकांना याचा नाहक त्रास सोसावा लागला. तब्बल पाच तास लोकलचा खोळंबा झाला होता. दुपारी 2 नंतर लोकलची सेवा सुरळीतपणे सुरु झाली.
एमएमआरडीएकडून ऐरोली ते कटाई उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम सुरु आहे. या मार्गात ऐरोली रेल्वे स्थानकानजीक भुयारी मार्गालगत दोन्ही दिशेला टाकण्यासाठी लोखंडी लॉन्च गर्डर टाकण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून हे काम सुरु आहे. शुक्रवारी पहाटे 1 ते 4 या कालावधीत ठाणे-बेलापूर रोडच्या दिशेने रेल्वे रुळावरुन जाणार्या मार्गिकेत गर्डर टाकण्यात आला.
मात्र गर्डर झुकलेले असल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून सकाळी 7.10 वाजल्यापासून ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी-पनवेल-ठाणे अशी दोन्ही दिशेच्या लोकल बंद करण्यात आल्या. ऐन सकाळच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर 11 वाजेपर्यंत 50 हून अधिक फेर्या रद्द करण्यात आल्या. लोकल सेवा बंद झाल्याने ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, जुईनगर या ठिकाणी प्रवाशांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. दुपारनंतर लोकल सेवा पूर्ववत सुरु झाल्याने संध्याकाळी घरी जाणार्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला.
ठाणे, पनवेल आणि वाशीसह विविध ठिकाणांहून 41 अतिरिक्त बस सेवा तैनात करण्यात आल्याने काही अंशी प्रवाशांना दिलासा मिळाला. काही प्रवाशांनी ठाणे ते कुर्ला असा प्रवास करुन पुढील मार्गक्रमण केले, तर ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरुन रिक्षाचा आधार घेत ऐरोली, रबाळे, दिघा येथील आयटी सेंटर व कंपन्यामधील कामगार कसरत करत कामावर दाखल झाले. लोकल बंद असल्यामुळे ठाणे बेलापूर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.