कोपरखैरणे : अवजड वाहनांच्या वर्दळीत सकाळी सकाळी वाहतूक नियंत्रण करतानाच हायड्रा या अवजड वाहनाने चिरडल्याने नवी मुंबई पोलिस दलातील वाहतूक हवालदार गणेश पाटील (वय 43) यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी साडे आकाराच्या सुमारास महापे उड्डाणपुलाखाली घडलेल्या या भयंकर अपघाताने गणेश पाटील यांच्या सहकार्यांच्या जीवाचाही थरकाप उडाला.
गणेश पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. पाटील यांचे वडील पोलीस दलातून निवृत्त झाले असून त्यांचे ज्येष्ठ बंधु राजेंद्र पाटील हे दैनिक पुढारीचे नवी मुंबईचे ब्युरो चिफ आहेत.
गणेश पाटील काही वर्षांपासून वाहतूक विभागात हवालदार म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सकाळी ते महापे वाहतूक बिट चौकीपासून शंभर मीटरच्या अंतरावर वाहतूक नियंत्रण करीत होते. तेथूनच हायड्रा वळण घेत होता. पाटील मार्ग दाखवत असताना हायड्रा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ते पाटील यांच्या दिशेने भरधाव आले.
सोबतच्या महिला पोलिसाने हायड्राच्या चालकाला जीवाचा आकांत करित वाहन थांबवण्यास सांगितले मात्र तोपर्यंत हे अवजड वाहन गणेश पाटील यांना चिरडून पुढे सरकले होते. त्यात त्यांचा करूण अंत झाला. हायड्रा चालक राजेश गौड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतल्याचे तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले.
महापे एमआयडीसीत दिवसरात्र अवजड वाहनांची वर्दळ असते. या वाहनांमुळे अनेक अपघात होत असून वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर बनली आहे. येथे काम करणारे पोलिस नेहमी अपघाताच्या शक्यतेने भयभीत असतात. बुधवारी अशाच अवजड वाहनांने तरूण तडफदार पोलिस हवालदार गणेश पाटील बळी घेतल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.