मुंबई : अमरनाथ आणि चारधाम यात्रेच्या बहाण्याने एका महिला पत्रकाराची फसवणूक करणाऱ्या युगांक विनयकुमार शर्मा या ठगाला मालाड पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेने मालाड आणि मालवणी पोलीस ठाण्यातील सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तक्रारदार महिला पत्रकार असून एका नामांकित वृत्तपत्रात कामाला आहे. ती सध्या तिच्या पतीसोबत मालाड परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी तिची एका खासगी टॅक्सीचा चालक हितेश शर्माशी ओळख झाली होती. त्याच्याच टॅक्सीतून ती मालाड येथून प्रभादेवी येथे जात होती. यावेळी हितेशने तिला त्याची टुर्स ॲण्ड ट्रॅव्हेल्सची एजन्सी असून त्यांच्या एजन्सीतर्फे धार्मिक यात्रेचे आयोजन केले जाते, असे सांगितले होते. काही दिवसांनी तिने त्याला कॉल करुन अमरनाथसाठी दोघांसाठी आणि चारधाम यात्रेसाठी नऊ जणांचे बुकींग केले होते. त्यासाठी तिने त्याला पावणेतीन लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. मात्र पेमेंट केल्यानंतर त्याने तिला प्रतिसाद देणे बंद केले. अनेकदा त्याचा मोबाईल बंद येत होता. त्याच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने मालाड पोलिसांत तक्रार केली.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी युगांकला मालाडमधून अटक केली. तपासात युगांग हा पदवीधर असून मालाडच्या सुंदरनगर, शिवम सोसायटीमध्ये राहतो. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मालाड, पायधुनी आणि मालवणी पोलीस ठाण्यात सातहून अधिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.