मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळे असलेल्या गेटवे ऑफ इंडिया आणि नरिमन पॉईंट येथे पर्यटकांची सुरक्षा आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी लवकरच एक विशेष ‘पर्यटन सुरक्षा दल’ (टुरिझम सिक्युरिटी फोर्स) तैनात करण्यात येणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी अशा दलाची नियुक्ती करण्यात आली होती. या दलाने पर्यटनाच्या मुख्य हंगामात गर्दीचे यशस्वीपणे नियोजन केले आहे. याच धर्तीवर आम्ही लवकरच गेटवे ऑफ इंडिया आणि नरिमन पॉईंट येथे हा उपक्रम सुरू करणार आहोत, असे त्यांनी सांगितलेे. मंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसोबत एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
महाबळेश्वर-पाचगणी येथे पर्यटन सुरक्षा दल यशस्वी ठरले आहे. गर्दीच्या वेळी प्रभावी नियंत्रण ठेवणे, पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, वाहतूक सुरळीत ठेवणे, पर्यटकांमधील किरकोळ वाद मिटवणे, बेदरकारपणे वाहन चालवण्यास आळा घालणे अशा जबाबदार्या या सुरक्षा दलाने पार पाडल्या आहे. मुंबईत तैनात होणार्या या सुरक्षा दलामध्ये महाराष्ट्र राज्य माजी सैनिक कल्याण मंडळाच्या अधिकार्यांचा समावेश असेल. या जवानांसाठी निवास व्यवस्थेसह त्यांना कायदेशीर प्रशिक्षणही दिले जाणार आहे.