firing on Tiger Shroff  Pudhari
मुंबई

Tiger Shroff firing case: परदेशात पाठवण्याचे आमिष, अडीच लाख ॲडव्हान्स दिले; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी माहिती

कोटा रेल्वे स्थानकावरून तीन संशयित ताब्यात; कथित सूत्रधाराचा शोध आणि हल्ल्यापूर्वीच्या रेकीची पोलिसांकडून तपासणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: टायगर श्रॉफच्या हत्येसाठी पकडलेल्या संशयित हल्लेखोरांना अडीच लाख रुपये ॲडव्हान्स आणि परदेशात नोकरीचे आमिष देण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती तपासादरम्यानसमोर आली आहे.

या प्रकरणातील तीन संशयित आरोपींना राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले असून, मुंबई पोलिसांनी त्यांना ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले आहे.

पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास करत असताना कोटा शहर पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये बिहारच्या बेगुसराय येथील रितिक ऊर्फ रोशन, हरियाणाच्या सोनिपत येथील रेहान आणि एका आरोपीचा समावेश आहे.

कोटा पोलिसांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्रीचा प्रवास टाळण्यासाठी पोलिस पथक सोमवारी कोटामध्येच थांबले होते. मंगळवारी सकाळी हे पथक आरोपींना घेऊन मुंबईकडे रवाना झाले.

कॅलिफोर्नियातून थेट सूत्रसंचालन

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, आरोपी रेहान हा लॉरेन्स बिष्णोई टोळीचा कथित हस्तक अनिल पंडित याच्या थेट संपर्कात होता. पंडितने या कटासाठी हल्लेखोरांना अडीच लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले होते.

हल्ल्याच्या वेळी पंडित थेट अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून एका ॲपद्वारे शूटरच्या संपर्कात राहून सूचना देत होता. गोळीबारासाठी वापरलेली शस्त्रेही त्यानेच पुरवल्याचा संशय आहे. याशिवाय हल्ल्यानंतर आरोपींना नेपाळमार्गे परदेशात पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दैनंदिन खर्चासाठी आरोपींना रोज ५ ते १० हजार रुपये ऑनलाईन पाठवले जात होते.

ओळख लपवण्यासाठी लूक बदलला

हल्ल्यापूर्वी आरोपी सुमारे एक महिना मुंबईतील एका हॉटेलमध्ये मुक्काम करून होते. गोळीबार केल्यानंतर तिघेही सुरतला गेले आणि तेथून जयपूर जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. संशय येऊ नये म्हणून तिघेही ट्रेनमध्ये वेगवेगळ्या डब्यांत बसले होते. तसेच ओळख लपवण्यासाठी त्यांनी धावत्या ट्रेनमध्येच स्वतःचे लांब केस कापून कपडे बदलले होते.

ऑडिओ क्लिप, सलमान खानवरून धमकी

हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये अनिल पंडित स्वतःला लॉरेन्स बिष्णोईचा लहान भाऊ असल्याचे सांगत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत आहे. त्याने टायगर श्रॉफला समजावूनही त्याने ऐकले नाही, असा दावा केला. तसेच अभिनेता सलमान खानसोबत काम करणाऱ्यांना आणि आपल्या विरोधात जाणाऱ्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबाराचा उलगडा होणार ?

अभिनेता टायगर श्रॉफच्या जुहू येथील गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे. राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना मुंबईकडे आणले जात असून, बुधवारी त्यांना मुंबईतील न्यायालयात हजर केले जाणार आहे.

त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हल्ल्यापूर्वी आरोपींनी रेकी केल्याचे सीसीटीव्ही चित्रण आणि दूरध्वनीवरील संभाषणांच्या नोंदींमधून समोर आले आहेत. हल्ल्यामागील कथित सूत्रधार आणि शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्यांचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.

टायगर श्रॉफ दर रविवारी जुहू येथील पुष्पा नरसी मैदानावर फुटबॉल खेळण्यासाठी जातो. १८ ऑक्टोबरला गोळीबार करण्यापूर्वी आरोपी ११ ऑक्टोबरलाही याच मैदानावर काही काळ थांबले होते. त्या दिवशी टायगर मैदानावर न आल्याने आरोपी परतले असावेत, असा पोलिसांनी व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही चित्रण आणि दूरध्वनीवरील संभाषणांच्या नोंदींच्या आधारे या हालचालींची पडताळणी सुरू आहे.

सूत्रधाराशी संपर्क घडवून देणारा समीर अटकेत

अमेरिकेत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या अनिल पंडितशी संपर्क घडवून दिल्याच्या आरोपावरून समीर नावाच्या व्यक्तीला हरियाणातील सोनीपत येथून अटक करण्यात आली आहे. समीरच्या अटकेने तपासाला नवी दिशा मिळाली आहे.

समीरचे मुंबईतील आणखी काही व्यक्तींशी संबंध आहेत का, याचाही तपास केला जात आहे. मात्र, या सर्व व्यक्तींची नेमकी भूमिका आणि कथित टोळीशी असलेला संबंध चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT