मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर १८ ऑक्टोबर रोजी गोळीबार करून पसार झालेल्या तीन शूटर्सना त्यांच्या हँडलर्सकडून पोलिसांच्या तपासाची प्रत्येक माहिती ‘रिअल टाईम’ मिळत असल्याचा खळबळजनक खुलासा मुंबई पोलिसांनी शनिवारी केला आहे. वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांच्या आधारे हँडलर्स आरोपींना पळून जाण्याचे मार्ग बदलण्याच्या सूचना सातत्याने देत होते.
एनक्रिप्टेड ॲप्सवरून सूचना: ‘तुमचे चेहरे टीव्हीवर आलेत, तिथून पळा!’
गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माध्यमांमध्ये हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित होताच मुख्य आरोपीच्या फोनवर हँडलरचा तातडीचा संदेश आला, ‘तुम्हा सर्वांचे चेहरे समोर आले आहेत, तिथून लगेच बाहेर पडा.
’ हे हँडलर्स ‘सिग्नल’ आणि ‘झांगी’ सारख्या सुरक्षित व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल ॲप्लिकेशन्सचा वापर करून शूटर्सच्या थेट संपर्कात होते. हल्लेखोरांची दुचाकी अंधेरीतून जप्त झाल्याची बातमी वाहिन्यांवर येताच आरोपींना वाहन बदलण्याचे निर्देश देण्यात आले.
या माहितीमुळे आरोपींनी आधी दुचाकी, नंतर लोकल, त्यानंतर टॅक्सी असा सातत्याने प्रवास बदलला. सुरत येथून बस पकडण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी रेल्वे पकडली. मात्र, मुंबई पोलिसांनी दिलेल्या तत्काळ माहितीच्या आधारे राजस्थानमधील कोटा पोलिसांनी १९ ऑक्टोबर रोजी धावत्या ट्रेनमधून या तिघांना अटक केली.
फूल सिंग (१८), रेहान रईसुद्दीन अन्सारी (१८) आणि ऋतिक महतो (२२) अशी या तीन मुख्य आरोपींची नावे असून ते सध्या ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.
गँगस्टर अनिल पंडित वॉन्टेड
१८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी जुहू परिसरात टायगरच्या गाडीवर झालेल्या गोळीबारात तो सुखरूप बचावला; तर त्याचा चालक आणि एक व्लॉगर जखमी झाले. या प्रकरणात आतापर्यंत राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणातून १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित आणि अमेरिकेतून कारवाया चालवणारा गँगस्टर अनिल पंडित याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून मुंबई पोलिसांनी त्याला वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित केले आहे.
इंदूरमधून प्रांजलला अटक
अभिनेता टायगर श्रॉफच्या जुहू येथील गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने गुजरातमधील सुरत येथून दोन अग्निशस्त्रे आणि १० जिवंत काडतुसे हस्तगत केली असून, मध्य प्रदेशातील इंदूर येथून प्रांजल ठाकरन या संशयिताला अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान हल्लेखोरांना शस्त्रे पुरविणाऱ्या व्यक्तींचा माग काढण्यात आला. त्यातून सुरतमधील एका ठिकाणापर्यंत तपास पथक पोहोचले आणि पिस्तुल, काडतुसे जप्त केली. जप्त केलेली शस्त्रे आणि काडतुसे न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या रिकाम्या काडतुसांशी त्यांचा मेळ घालण्यात येणार आहे. या चाचणीतून जप्त शस्त्रांचा गोळीबारात वापर झाला होता का, हे स्पष्ट होण्यास मदत होईल. शस्त्रांचा मूळ पुरवठादार आणि त्यांची आंतरराज्यीय वाहतूक करणाऱ्या व्यक्तींचा शोधही सुरू आहे.
प्रांजल ठाकरन अभियंता
प्रांजल ठाकरन हा हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी असून, तो अभियंता आहे. भावाच्या उपचारांसाठी तो इंदूरमध्ये आला होता. मुंबई गुन्हे शाखेने इंदूर गुन्हे शाखेच्या मदतीने परदेशीपुरा परिसरातून त्याला ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली.