मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ याच्या जुहू येथील कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्या ११व्या आरोपी प्रांजल ठकरान याला न्यायालयाने ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हरियाणातील सोनीपत येथील २२ वर्षीय प्रांजल याला मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक करण्यात आली. गोळीबार करणाऱ्या आरोपींना शस्त्र पुरविण्यात त्याची कथित भूमिका असून, या गुन्ह्यामागील कट आणि शस्त्रपुरवठ्याची साखळी उघड करण्यासाठी पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.
प्रांजल हा इंदूरमधील परदेशीपुरा परिसरातील एका रुग्णालयात आपल्या आजारी भावाला भेटण्यासाठी आला असताना मुंबई आणि इंदूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत त्याचा गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एकाशी संपर्क असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा कथित सूत्रधार अनिल पंडित याच्याशीही संपर्क होता का, याची तपास यंत्रणा पडताळणी करीत आहे.
पिस्तूल पुरविल्याचा संशय
तपासातील माहितीनुसार, गोळीबारासाठी वापरण्यात आलेले देशी बनावटीचे पिस्तूल प्रांजलने पुरविल्याचा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणातील अन्य आरोपी कुणाल जमिनसिंग याने तुर्की बनावटीचे झिगाना पिस्तूल पुरविल्याचा आरोप आहे.
शस्त्रे कोणी मिळवली, ती मुंबईत कशी आणली आणि गोळीबार करणाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कोणाची भूमिका होती, याचा तपास सुरू आहे.