Tiger Memon Properties Auction 
मुंबई

Tiger Memon Properties Auction | टायगर मेमनच्या १४ मालमत्तांचा आता होणार लिलाव

Tiger Memon Properties Auction - वाकोल्यातील ४०० कोटींच्या भूखंडासह झवेरी बाजार, वांद्रे, कुर्त्यातील मालमत्तांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महेश पांचाळ

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधार, टायगर मेमनच्या कुटुंबीयांच्या आणखी १४ मालमत्तांच्या जप्ती व लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. माहिम आणि वांद्रे येथील तीन मालमत्तांचा ई-लिलाव मंगळवारी पार पडल्यानंतर आता वाकोला येथील सुमारे ४०० कोटी किमतीच्या भूखंडासह झवेरी बाजार, वांद्रे, कुर्ला आणि मनीष मार्केटमधील मालमत्तांच्या लिलावाची तयारी सुरू होत आहे.

मुंबईच्या आयुष्यातील पहिली बॉम्बस्फोट मालिका कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीने १९९३ साली घडवली. बाबरी मशीद पाडल्याचा बदला म्हणून माहीम, सी रॉक, प्लाझा सिनेमा, सेंच्युरी बाजार, झवेरी बाजार, काथा बाजार, एअर इंडिया बिल्डिंग, मांडवी मशीद, पासपोर्ट कार्यालय, मुंबई शेअर बाजार, जुहू सेंटॉर, विमानतळ आदी ठिकाणी टार्गेट करत हे स्फोट घडवण्यात आले. हे स्फोट घडवण्यात टायगर मेमनचा मुख्य सूत्रधार म्हणून हात होता. मुंबईत १३ ठिकाणी एकाच वेळी हे स्फोट घडताच टायगर कुटुंबासह पाकिस्तानला पळाला. दाऊद त्याआधीच पसार टायगर मेमनच्या १४ मालमत्तांचा आता होणार लिलाव झाला होता. टायगर आणि दाऊद दोघेही पाकिस्तानातच आहेत. ते हाती लागण्याची शक्यता आता धूसर होत चालली असतानाच टायगरच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

अधिकृत माहितीनुसार, टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबीयांच्या एकूण १७ मालमत्तांची नोंद आहे. त्यापैकी ८ मालमत्तांचा ताबा प्रशासनाने मिळविला आहे, ५ मालमत्तांचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर उर्वरित ४ मालमत्तांबाबत न्यायालयीन वाद प्रलंबित आहेत.

सर्वाधिक चर्चेत असलेली मालमत्ता म्हणजे वाकोला (कोळे कल्याण) येथील सुमारे १० हजार चौरस मीटरचा भूखंड. या भूखंडाची बाजारातील किंमत सुमारे ४०० कोटी असल्याचा अंदाज आहे. मात्र, भूखंडावर अतिक्रमण असल्याने प्रशासनाला अद्याप प्रत्यक्ष ताबा मिळालेला नाही. याशिवाय झवेरी बाजारातील एक मालमत्ता, वांद्रे येथील आणखी एक फ्लॅट, कुर्त्यातील दोन फ्लॅट आणि दक्षिण मुंबईतील मनीष मार्केटमधील चार दुकानेही लिलावाच्या यादीत आहेत. मनीष मार्केटमधील दुकाने टायगर मेमन आणि मोहम्मद दोसा यांच्या संयुक्त मालकीची असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.

'तस्कर आणि परकीय चलन गैरव्यवहार करणारे (मालमत्ता जप्ती) अधिनियम' अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या या मालमत्तांचा टप्प्याटप्प्याने लिलाव केला जाणार आहे. संबंधित मालमत्तांचा ताबा मिळविणे, अतिक्रमण हटविणे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लिलावाची तारीख निश्चित केली जाणार आहे. टायगर मेमन आजही फरार आहे. त्याचा भाऊ याकूब मेमनला ३० जुलै २०१५ रोजी नागपूर कारागृहात फाशी देण्यात आली.

लिलाव झालेल्या मालमत्ता

माहिम येथील टायगर मेमनचे कार्यालय, अल-हुसेनी इमारतीतील गॅरेजसह एक सदनिका आणि वांद्रे येथील एक सदनिका या तीन मालमत्तांचा नुकताच ई-लिलाव पार पडला आहे. मात्र, अंतिम बोली, यशस्वी बोलीदार आणि विक्रीची अधिकृत रक्कम जाहीर झालेली नाही.

लिलावाच्या प्रतीक्षेत

४०० कोटींचा वाकोला (कोळे कल्याण) येथील भूखंड

झवेरी बाजारातील मालमत्ता

वांद्रे येथील आणखी एक फ्लॅट

कुर्त्यातील दोन फ्लॅट

मनीष मार्केटमधील चार दुकाने

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने लिलावाची शक्यता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT