कोपरखैरणे : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकाच दिवसात तीन घरफोडीची नोंद झाली असून यात 34 लाख 86 हजाराचा ऐवज चोरी .झाला आहे. वाशी, नेरुळ आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात या घरफोडी झाल्या आहेत. दोन ठिकाणी घरात कोणी नसताना तर खांदेश्वर येथे घरात लोक असताना एका तासात 4 मोबाईल चोरी झाले आहेत.
कोपरखैराणे येथे राहणाऱ्या प्रीती माळी यांचे वडील वाशी सेक्टर 8 येथे राहतात. वडील एकटेच राहात असल्याने माळी यांचे नेहमी येणे जाणे असते. गावी एका नातेवाईकांच्या विवाह निमित्त सर्व जण गावी गेले होते पार्ट आल्यावर घराचा कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत होता. आत जाऊन पाहणी केली असता आतील 29 लाख 36 हजार रुपयांचे दागिने चोरी झाल्याचे समोर आले.
यात दागिने अमेरिकन चलन असणारे डॉलर आणि भारतीय चलन असणारी रोकडचा समावेश आहे. हे घर रो हाऊस असून चोरट्याला कडी कोयंडा तोडूनही दरवाजा उघडता न आल्याने दरवाजाची चौकट तोडून चोराने आत प्रवेश केल्याचे आढळून आले आहे. हि घटना 25 ऑक्टोबर रात्री 11 ते 28 ऑक्टोबर दरम्यान सर्व गावी गेले असताना घडली आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे.
नेरुळ सेक्टर 9 येथे राहणारे प्रवीण केसरवाणी यांच्या घरातही चोरी झाली असून चोरट्याने 5 लाखांचा ऐवज चोरी केला आहे. हि घटना 24 तारखेला संध्याकाळी साडे सहा ते 11 च्या दरम्यान घडली आहे. या दरम्यान कामानिमित्त बाहेर गेले असता चोरट्याने कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करीत 30 हजाराची रोकड आणि विविध पाच दागिने असा एकूण 5 लाखांचा ऐवज चोरी केला आहे. या प्रकरणी फिर्यादी पोलीस ठाण्यात येताच 28 तारखेला नेरुळ पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवीन पनवेल सेक्टर 15 येथे राहणारे ऋषी खरात हे आपल्या मित्रांच्या समवेत राहत्या खांदेश्वर येथे रात्री झोपले असता अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून घरातील 55 हजार रुपयांचे एकूण चार मोबाईल चोरी केले आहेत.हि घटना 28 तारखेला सकाळी साडे सात ते आठ या अर्धा तासात घडली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.