Accident News Pudhari File Photo
मुंबई

Mumbai accident : विक्रोळी-गोरेगावातील दोन अपघातांत तिघांचा मृत्यू, एक गंभीर

वेगाने आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने घडला अपघात, गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विक्रोळी आणि गोरेगाव येथील दोन अपघातात तिघांचा मृत्यू झाला. त्यात एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मृतांमध्ये प्रविण मुन्नालाल यादव, राज अर्जुन कहार आणि गोविंद कदम यांचा समावेश आहे. याप्रकरणी विक्रोळी आणि आरे पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता विक्रोळीतील पाचखड्डा, पूर्व दुतगती महामार्ग, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर झाला.

अमीत बळीराम पवार हे एका खाजगी कंपनीत कामाला असून जोगेश्वरीत राहतात. मंगळवारी ते कामानिमित्त विक्रोळी येथे आले होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला ट्रिपल सीट जाणाऱ्या एका दुचाकीने धडक दिली. त्यात दुचाकीवरील तिन्ही तरुण गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने मुलुंडच्या वीर सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्रविण आणि राज या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचा तिसरा मित्र गुलशन यादव हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला सायन रुग्णालयात हलविण्यात आले.

दुसऱ्या अपघातात गोविंद कदम (53) या व्यावसायिकाचा मृत्यू झाला. गोविंद हे गोरेगाव येथे राहत असून त्यांची प्लास्टिक सिल उत्पादन कंपनी आहे. शुक्रवारी सकाळी ते घरातून कंपनीत जाण्यासाठी निघाले होते. यावेळी समोरुन येणाऱ्या एका कारने त्यांच्या बाईकला धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी त्यांचा मुलगा मयुर कदम याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालक शामराव पाटील याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून गोविंद कदम यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

  • घटनेनंतर पवार यांनी तत्काळ 100 क्रमांकाच्या आपत्कालीन हेल्पलाइनवर फोन करून पोलिसांना माहिती दिली. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना मुलुंड पूर्वेतील स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी तरूणांनी दुचाकी वेगाने आणि निष्काळजीपणे चालवली. त्यामुळे अपघात झाला. बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT