मुंबई

अ‍ॅड. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड : तिघांना अटक

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतल्याने अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची गुरुवारी सकाळी तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी मंगेश संजय साबळे (25), वसंत शामराव बनसोडे (32) आणि राजू प्रकाश साठे (32) यांना अटक केली आहे.

परळमधील क्रिस्टल टॉवरमध्ये सदावर्ते हे कुटुंबासोबत राहतात. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या इमारतीबाहेर रस्त्याकडेला उभ्या केल्या होत्या. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास चार तरुण 'जय भवानी जय शिवाजी', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो', 'एक मराठा लाख मराठा', अशा घोषणा देत येथे पोहोचले. यातील तिघांनी लाकडी दांडक्यांनी सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी त्यांचा साथीदार हा मोबाईलच्या माध्यमातून फेसबुक लाईव्ह करत होता. तोडफोडीच्या या घटनेने येथे एकच खळबळ उडाली. सदावर्ते यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पथकाने लगेचच तोडफोड करणार्‍या तिघांना ताब्यात घेतले. तर फेसबुक लाईव्ह करणारा तेथून पसार झाला.

पोलिसांनी या घटनेची माहिती मुख्य नियंत्रण कक्षाला दिली. तिघांनाही पुढील कारवाईसाठी भोईवाडा पोलिस ठाण्यात नेले. भोईवाडा पोलिसांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक नागेंद्र लोकरे यांची सरकारतर्फे फिर्याद
नोंदवून घेतली. साबळे, बनसोडे, साठे आणि अनोळखी तरुणाविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली.

SCROLL FOR NEXT