मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाला शुक्रवारी धमकीचा ई-मेल आल्याने न्यायालय परिसरात सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्बशोधक व नाशक पथकासह पोलिसांच्या श्वानपथकाने संपूर्ण न्यायालय परिसराची कसून तपासणी केली. या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक सामग्री आढळून आली नाही. मात्र, धमकीच्या ई-मेलचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे.
सध्या मुंबई उच्च न्यायालयात दिवाळीची सुट्टी सुरू असली, तरी सुट्टीकालीन न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि अन्य संबंधित व्यक्तींची ये-जा सुरू असते. धमकीचा ई-मेल मिळताच कोणतीही जोखीम न पत्करता सुरक्षा यंत्रणांनी तातडीने तपासणी मोहीम हाती घेतली. न्यायालयातील विविध विभाग, परिसर आणि संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत कोणतीही स्फोटक सामग्री किंवा संशयास्पद वस्तू आढळली नसली, तरी ई-मेलमधील मजकूर आणि त्याचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे.
धमकीच्या ई-मेलमागे एकच सूत्रधार?
गेल्या सहा महिन्यांत चार ई-मेलद्वारे धमक्या देण्यात आल्या. या सर्व ई-मेलमधील भाषा, धमकी देण्याची पद्धत आणि लक्ष्य करण्यात आलेल्या ठिकाणांतील साम्य लक्षात घेता, त्यामागे एकच सूत्रधार असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.