मुंबई : पावसाने दडी मारल्याने यंदा खरीप पीक वाया गेले असताना आता रब्बीची पेरणी अंदाजे २५ हेक्टरवर होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. १९७२ च्या दुष्काळातही शेतकऱ्यांनी ४७ लाख हेक्टरवर पेरणी केली होती. यंदा मात्र १५ लाख हेक्टरपेक्षा कमी पेरणी झाली आहे. म्हणून यंदाचा दुष्काळ १९७२ पेक्षाही भीषण असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसते.
कृषी विभागाच्या खरीप व रब्बी हंगामाच्या पेरणीबाबतच्या आकडेवारीवरून या दुष्काळाची तीव्रता समोर आली आहे. यंदा आतापर्यंत सरासरी रब्बी पेरणी १४.७४ लाख हेक्टरवर झाली. डिसेंबरअखेरपर्यंत पेरणी अंदाजे फक्त २० ते २५ लाख हेक्टरवर होईल. गेल्यावर्षी याच काळात रब्बी पेरणी ५१ लाख हेक्टरवर झाली होती. तर, गतवर्षी रब्बीची एकूण पेरणी ६७.५५ लाख हेक्टरवर झाली होती. म्हणजे यंदा सरासरीच्या फक्त २५ टक्के पेरणी होईल, असा अंदाज आहे.
अन्नधान्य, कडधान्य, तेलबियांना फटका
पीकनिहाय तुलना केल्यास १९७२-७३ मध्ये अन्नधान्याची पेरणी ३६.६४ लाख हेक्टर, कडधान्य ७.७९ हेक्टर, तर तेलबिया पेरणी ६.३४ लाख हेक्टरवर झाली होती. यंदा हे आकडे अनुक्रमे ७.७९ लाख हेक्टर, ४.३१ लाख हेक्टर आणि १६,१०६ हेक्टर असे आहेत.
सरासरीपेक्षा १९ टक्के कमी पाऊस
प्रशांत महासागरात शक्तिशाली ‘अल निनो’ सक्रिय झाल्याने पाऊस महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १९ टक्के कमी झाला आहे. जो पडला तो फक्त जुलैच्या पहिल्या १५ दिवसांत झाला. नंतर त्याने दडी मारली. खरीपही गेले आणि जमिनीत ओलही राहिली नाही, अशी कारणे पेरणी घटण्याची देण्यात आली आहेत.
मराठवाड्यात बिकट अवस्था
मराठवाड्यात सगळ्यात वाईट अवस्था आहे. छत्रपती संभाजीनगर फक्त ५.२५ टक्के, जालना ४.७९ टक्के, धाराशिव ११ टक्के, परभणी २२.५१ टक्के, बीड २८.९२ टक्के, अशी संपूर्ण मराठवाड्यात फक्त १४.९५ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे.
१९७२ च्या तुलनेत एकतृतीयांशपेक्षा कमी पेरणी
यंदाच्या आकडेवारीची १९७२ च्या दुष्काळाशी तुलना केली, तर या दुष्काळाचा फटका मोठा आहे. १९७२-७३ मध्ये ४७.२९ लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. तर, १९९२ मध्ये आतापर्यंतची सर्वात कमी पेरणी ४०.३९ लाख हेक्टरवर झाली होती. २०१८-१९ च्या दुष्काळात ४८.१७ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा २०२६-२७ च्या रब्बी हंगामात आतापर्यंत फक्त १४.७४ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. १९७२ मध्येही ४७ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यंदा त्याच्या एकतृतीयांशही नाही.