मुंबई

Raj Thackeray : ‘ही भीती असलीच पाहिजे’, त्रिभाषा धोरण स्थगित होताच राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; मोर्चा रद्द

'इयत्ता पहिलीपासून तीन भाषांच्या नावाखाली हिंदी लादण्याचा डाव अखेर उधळला'

रणजित गायकवाड

मुंबई : ‘अखेर सरकार झुकले.. पण हा उशिरा सुचलेला शहाणपणा नाही, तर हा फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या एकजुटीने आणि आमच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे मिळालेला विजय आहे. ही भीती, हा धसका कायम राहिला पाहिजे,’ अशा घणाघाती शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याबद्दल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने दोन्ही जीआर रद्द केले असले तरी, यामागे नक्की कुठून दबाव होता, हे एक गूढच आहे, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

मनसेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात राज ठाकरे यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. ‘इयत्ता पहिलीपासून तीन भाषांच्या नावाखाली हिंदी लादण्याचा डाव अखेर उधळला गेला, यासाठी मी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे अभिनंदन करतो,’ असे म्हणत त्यांनी या विजयाचे श्रेय पूर्णपणे जनतेला आणि मनसेच्या सातत्यपूर्ण संघर्षाला दिले.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची आठवण झाली असती!

मनसेच्या भूमिकेची धार स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२४ पासूनच या विषयावर आवाज उठवला होता. आम्ही हा मुद्दा तापवत नेल्यानंतर एकेक राजकीय पक्ष जागे झाले. आम्ही जेव्हा पक्षविरहित भव्य मोर्चाची घोषणा केली, तेव्हा अनेक पक्ष आणि संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता, तर तो इतका विशाल झाला असता की लोकांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण झाली असती. याच एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही, ही भीती असलीच पाहिजे.’

नवीन समितीचा खेळ खपवून घेणार नाही!

सरकारने नेमलेल्या नवीन समितीवरही राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी थेट इशारा देत म्हटले, ‘आता पुन्हा एकदा नवीन समितीचा खेळ सुरू झाला आहे. मी स्वच्छ आणि थेट शब्दांत सांगतोय, समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, असले प्रकार महाराष्ट्रात परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत. ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी. हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे, असे आम्ही आणि महाराष्ट्राची जनता गृहीत धरत आहोत. त्यामुळे पुन्हा समितीच्या अहवालाचा घोळ घालण्याचा प्रयत्न केल्यास, त्या समितीला महाराष्ट्रात काम करू दिले जाणार नाही, याची नोंद सरकारने घ्यावी.’

‘आपलेच लोक भाषेला नख लावतायत’

मराठी माणसाला आत्मपरीक्षणाचे आवाहन करत राज ठाकरे म्हणाले, ‘आता मराठी माणसाने यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला आणि तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोक बसले आहेत. ज्या भाषेत ते शिकले, वाढले, जी त्यांची ओळख आहे, तिच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नाही. त्यांना फक्त कोणालातरी खुश करायचे आहे. यावेळेस मराठी मनांचा जो एकत्रित राग दिसला, तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.’

शेवटी, या एकजुटीबद्दल आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, ‘भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली, हा मोठा आनंद आहे. हा कडवटपणा, ही अस्मिता अधिक वृद्धिंगत होऊ दे आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे, हीच इच्छा आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT