मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई या शहरांवरील ताण कमी व्हावा या दृष्टीने विकसित करण्यात येत असलेल्या तिसऱ्या मुंबईचे अखेर नामकरण झाले आहे. कर्नाळा-साई-चिरनेर न्यू टाऊन (केएससी न्यू टाऊन) या नावाने ही तिसरी मुंबई ओळखली जाईल. (KSC New Town)
नवी मुंबई विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रात नवे शहर विकसित केले जात आहे. २०१३ साली नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. या प्रकल्पातील ८० गावांचा समावेश तिसऱ्या मुंबईत करण्यात आला आहे. खोपटा न्यू टाऊन अधिसूचित क्षेत्रातील ३३ गावे, मुंबई महानगर प्रादेशिक योजनेतील २ आणि रायगड प्रादेशिक योजनेतील ९ गावेही यात समाविष्ट आहेत.
केएससी न्यू टाऊनसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एमएमआरडीएतर्फे या नव्या शहरासाठी आराखडा तयार केला जात आहे. तसेच एमएमआरडीएला भूसंपादनाचे अधिकार देण्यात आले आहेत. शहर विकसित करताना येथे रहिवासी संकुलांसोबतच औद्योगिक वसाहतीही उभारल्या जातील. त्यामुळे रोजगार निर्मिती होऊ शकेल. एखाद्या विकसित शहराप्रमाणेच येथे सर्व सोयी-सुविधा उभारल्या जातील. चिरनेर येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा परिसर केएससी न्यू टाऊनमध्ये समाविष्ट असेल. तसेच कर्नाळा पक्षी अभयारण्यही याच क्षेत्रात येते. यावरूनच नव्या शहराचे नाव कर्नाळा-साई-चिरनेर न्यू टाऊन असे ठेवण्यात आले आहे.