The renovated Khar railway station is reminiscent of British style
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट थ्री ए प्रकल्पांतर्गत खार रोड रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण केले आहे. कॉर्पोरेशनच्या मुंबई शहरातील 17 उपनगरीय स्थानकांच्या पुनर्विकास (अपग्रेडेशन) उपक्रमाचा एक भाग असून त्यासाठी 950 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
खार रोड स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 85 कोटी खर्च केले जाणार आहेत. नूतनीकरणामध्ये प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून गर्दी कमी करणे आणि सुलभता, सुरक्षितता आणि सुविधा वाढवणे, हा प्रमुख उद्देश आहे.
खार स्थानकातील 4,952 चौरस मीटर, एलिव्हेटेड डेकचा परिसर हे प्रकल्पाच्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांपैकी एक आहे. त्यात 197 मीटर बाय 22.3 मीटर मुख्य डेक, 39 मीटर बाय 10.6 मीटर विस्तार (एक्सटेंशन) आणि जवळच्या रस्त्यांना जोडणार्या 31 मीटर बाय 4.7 मीटर स्कायवॉकचा समावेश आहे.
स्टेशनमधील 270 मीटर लांबीच्या होम प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांना सहज ये-जा करता येईल आणि प्लॅटफॉर्मची गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे.
स्थानकावर आता पाच एस्कलेटर आहेत. त्यात एक दुर्मीळ डबल-डिस्चार्ज मॉडेल एस्कलेटरचा समावेश आहे. तीन लिफ्ट आणि हँडरेल्ससह एक चांगल्या दर्जाचा रॅम्प आहे. या रॅम्पमुळे ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तीसह (पीडब्ल्यूडी) सर्वांचा प्रवास सुलभ होईल. दृष्टिहीन प्रवाशांसाठी चांगल्या नेव्हिगेशनसाठी प्लॅटफॉर्म, जिने आणि बुकिंग परिसरामध्ये स्पर्शिक (टॅक्टाइल) टाइल्स देखील बसवण्यात आल्या आहेत.
स्टेशनवर आता तळाला आणि एलिव्हेटेड डेकवर अशी दोन तिकीट बुकिंग ऑफिस आहेत. तिथे ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी विशेष सुविधा आहे.
समावेशक डिझाइनसह एक डिलक्स टॉयलेट ब्लॉक, एक नवीन स्टेशन व्यवस्थापक कार्यालय आणि सुधारित व्हेंटिलेटशनसाठी हाय-व्हॉल्यूम लो-स्पीड (एचव्हीएलएस) पंखे देखील जोडले गेले आहेत.
प्लॅटफॉर्मवर आता सुधारित प्रकाशयोजना आणि चांगले व्हेंटिलेटशन आहे. स्टेशनच्या परिभ्रमण क्षेत्र आणि दर्शनी भागात सौंदर्यात्मक सुधारणा झाल्या आहेत.
खार रोड स्टेशनच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा हे उपनगरीय रेल्वेवर पायाभूत सुविधांची गर्दी कमी करण्याच्या आणि प्रवाशांचा अनुभव सुधारण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.
- विलास सोपान वाडेकर
(सीएमडी, एमआरव्हीसी)
पश्चिम रेल्वेच्या सर्व उपनगरीय स्थानकांमध्ये खार हे सर्वात मोठे स्टेशन स्थानकावर पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील सर्वात मोठा डेक स्थानकावरून दररोज प्रवास करणार्या 1.6 लाख प्रवाशांना फायदा