मुंबई

आईस्क्रिममध्ये सापडलेलं बोट कंपनीच्या कर्मचाऱ्याचं?

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वी मालाड येथे आईस्क्रिममध्ये मानवी बोट सापडल्याची खळबळजनक घटना घडली होती. यानंतर या घटनेबाबत अनेक उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. आता या घटनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आईस्क्रिममध्ये सापडलेला बोटाचा तुकडा इंदापूर येथे असलेल्या आईस्क्रिम फॅक्टरीतील कर्मचाऱ्याचा असल्याची शक्यता आहे. याबाबत पुढील चौकशी मालाड पोलीस करत आहेत.

डीएनए मॅच करणार

मालाड येथे आईस्क्रिममध्ये मानवी बोटचा तुकडा फॅक्टरीतील कर्मचाऱ्याचा असल्याची शक्यता आहे. आईस्क्रिमचं पॅकिंग करताना झालेल्या अपघातात संबंधित कर्मचाऱ्याच्या बोटाचा काही भाग तुटल्याची माहिती आहे. फॅक्टरीमध्ये काम करताना संबंधित कर्मचाऱ्याचा अपघात झाला होता. यामध्ये त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा काही भाग त्याला गमवावा लागला होता. बोटाचा तुकडा गमावलेल्या कर्मचाऱ्याला शोधण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. तपासात आता कर्मचाऱ्याचा डीएनए आईस्क्रिममध्ये सापडलेल्या मानवी बोटाच्या डीएनएशी मॅच केला जाणार आहे. जवळपास महिन्याभरापूर्वी आईस्क्रिमचं पॅकेजिंग करताना हा अपघात झाला होता.

बोटांचा डीएनए मॅच करणार

या प्रकरणाचा तपास करत मालाड पोलीस आईस्क्रिमचं पॅकेजिंग झालेल्या कंपनीपर्यंत पोहोचले. तिथे तपास करताना त्यांना अपघातात बोट गमावलेल्या कर्मचाऱ्याविषयी माहिती मिळाली. पोलिसांनी त्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासण्यांसाठी पाठवले आहे. त्याचे अहवाल राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (एफएसएल) पाठवले जातील. तिथेच गेल्या आठवड्यात संबंधित बोट विश्लेषणासाठी पाठवले गेले होते.

नक्की काय आहे प्रकरण?

मालाड येथील एका डॉक्टरने तीन ऑनलाईन आईस्क्रिम मागवली होती. यातील एका आईस्क्रिममध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळला होता. ही घटना 12 जून रोजी घडली होती. यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर दि. 13 जून रोजी मालाड पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 272 (विक्रीच्या उद्देशाने खाद्यपदार्थात भेसळ करणे), 273 (हानीकारक अन्नाची विक्री) आणि 336 (जीव किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे) अंतर्गत संबंधित आईस्क्रिममधील जबाबदार लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला.

SCROLL FOR NEXT