मुंबई; पुढारी डेस्क : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचे कधीही विस्मरण होणे नाही, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या हल्ल्यातील शहिदांचे शुक्रवारी स्मरण केले. या हल्ल्याचे सूत्रधार आजही मोकाट आहेत आणि त्यांना कोणतीही शिक्षा झालेली नाही. यामुळे सामूहिक विश्वासार्हताच दुय्यम ठरली, अशा शब्दांत त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या धोरणावर टीकास्त्र सोडले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची दोन दिवसीय बैठक ऐतिहासिक हॉटेल ताजमहल पॅलेसमध्ये शुक्रवारी सुरू झाली. २६/११ च्या हल्ल्यात भारतीय पोलीस दलाचे १८ जवान, ताज हॉटेलचे १२ कर्मचारी व सुरक्षा जवान धारातीर्थी पडले. त्यांच्या शौर्याला सलाम करत जयशंकर म्हणाले, हा हल्ला केवळ मुंबईवरचा नव्हता. आंतरराष्ट्रीय समुदायावर झालेला हा हल्ला होता. १४० भारतीय नागरिक, २३ देशांचे २६ नागरिक या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. त्यामुळेच दहशतवादाविरुद्ध संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रत्येक देशाला एकजुटीने उभे ठाकावे लागेल. या हल्ल्यास जबाबदार असलेल्या अतिरेक्यांचा फैसला होईपर्यंत ही लढाई थांबवता येणार नाही. २६/११ चे विस्मरण होऊ दिले जाणार नाही.
दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपद भारताकडे आहे. या समितीची बैठक मुंबईतून सुरू व्हावी, याला महत्त्व आहे. कारण भारताच्या आर्थिक विकासाचे प्रतिबिंब मुंबईत दिसते. अशा चर्चेसाठी मुंबईसारखी दुसरी जागा नाही. सुरक्षा परिषदेच्या समितीने मुंबईत ही बैठक घेऊन जगाला एक संदेश दिला, अशी नोंद परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय वर्मा यांनी केली. या बैठकीत नव्या तंत्रज्ञानासह दहशतवादाचा मुकाबला करण्यावर चर्चा होईल. खास करून इंटरनेट, अतिरेक्यांकडून आर्थिक व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणा आणि ड्रोन यावर या बैठकीचा प्रकाशझोत असेल.
२६/११ च्या जखमांच्या खुणा मुंबईतील ज्या जागांवर आजही दिसतात, त्यापैकी एक असलेल्या ताजमध्येच या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून सुरक्षा परिषदेच्या दहशतवादीविरोधी समितीची ही बैठक सुरू झाली. यावेळी या भीषण हल्ल्याचे चित्रणही दाखवण्यात आले. मुंबईत ताजमहलसह हॉटेल ओबेरॉय, लीओपोल्ड कॅफे, नरिमन हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी ठिकाणी झालेल्या हल्ल्यांची छायाचित्रेही इथे मांडण्यात आली होती.