मुंबई : मुंबईसह राज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत आहे. गेल्या आठवड्यात राज्यभरात 11 जणांचे बळी गेले आहेत. राज्यातील सर्वाधिक 779 रुग्ण मुंबईत आढळले आहेत. कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर असून, एकूण रुग्णसंख्या 263 इतकी आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, रुग्णसंख्येच्या बाबतीत पुणे दुसर्या क्रमांकावर, तर नाशिक तिसर्या क्रमांकावर आहे. या अहवालानुसार, मुंबईसह ‘एमएमआर’मध्ये दररोज तीनजणांना स्वाईन फ्लूच्या विषाणूची लागण होत आहे. अनेकदा हवामान बदलले की, हंगामी आजार वाढू लागतात. सामान्यतः, स्वाईन फ्लूचा विषाणू हिवाळ्यानंतर सक्रिय होतो; परंतु यावेळी तो वर्षाच्या सुरुवातीपासून सक्रिय राहिला आहे. राज्यात 1 जानेवारी ते 26 नोव्हेंबर या कालावधीत स्वाईन फ्लूचे 2 हजार 335 रुग्ण आढळले असून, 68 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्य आरोग्यसेवा संचालनालय विभागाच्या निगराणी अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर म्हणाल्या की, राज्य शासनाने यावर्षी गर्भवती महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्वाईन फ्लू या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींना लसीकरण सुरू केले आहे. आतापर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये 45 हजारांहून अधिक लसींचे वाटप करण्यात आले आहे. 2 हजार 608 जणांचे लसीकरणही करण्यात आले आहे.