Comrade Govind Pansare Case 
मुंबई

कॉ. पानसरे यांच्या हत्येत सनातन संस्थेचा सहभाग; कुटुंबीयांचा हायकोर्टात दावा

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कॉमे्रड गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणात सनातन संस्थेचा सहभाग असल्याचा दावा करताना आम्हाला आणखी काही सांगायचे आहे. आमचा जबाब नोंदविला जावा, अशी विनंती पानसरे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली. याची दखल घेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने 25 जूनपूर्वी जबाब नोंदविण्याचे निर्देश दिले. तसेच याचिकेची सुनावणी 12 जुलैपर्यंत तहकूब ठेवली.

16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉ. पानसरे यांच्यावर कोल्हापुरात गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांचा 20 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. कॉ. पानसरे, 'अंनिस'चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटाचे सूत्रधार एकच असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, गेल्या सात वर्षांत प्रमुख आरोपीचा शोध न लागल्याने पानसरे कुटुंबीयांनी 'एसआयटी'च्या तपासावर नाराजी व्यक्त करत तपास 'एटीएस'कडे वर्ग करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. त्यानुसार तपास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडेे (एटीएस) वर्ग करण्यात आला.

त्या याचिकेवर गुरुवारी खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी पानसरे कुटुंबीयांतर्फे अ‍ॅड. अभय नेवगी यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात कनिष्ठ न्यायालयाने पोलिस आणि 'एसआयटी'च्या तपासावर नाराजी व्यक्त केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या हत्याकांडात सनातन संस्थेचा सहभाग असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच आम्हाला काही त्या संदर्भात सांगायचे असून, त्या आधारे तपास करावा, अशी विनंती केली. यावेळी तपास यंत्रणेच्या वतीने अ‍ॅड. अशोक मुंदरगी यांनी पूर्वी तपास करणार्‍या 'एसआयटी'नेही या अंगाने तपास केल्याची कबुली दिली. अखेर खंडपीठाने पानसरे कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेण्याचे आणि त्या द़ृष्टीने तपास करण्याचे निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT