मुंबई

कोकण मंडळ म्हाडाच्या घरांच्या संगणकीय सोडतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांना बळ आणि आकार देण्याची जबाबदारी म्हाडा चांगल्या रितीने पेलत आहे. अनेक कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. म्हाडाच्या कोकण मंडळाची ४ हजार ६४० सदनिकांची आणि १४ भूखंडांची संगणकीय लॉटरी काढण्यात आली. या सोडतीचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, किरण सरनाईक, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंग, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, कोकण म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, घर म्हणजे म्हाडा हे नाते सामान्यांच्या मनात घट्ट झाले आहे. म्हाडाची गरजूंना घरे देण्याची कार्यप्रणाली कौतुकास्पद आहे. सोडतीला मिळालेला प्रतिसाद पाहिला तर म्हाडावरील विश्वास सिद्ध होतो. आजच्या सोडतीत घर मिळालेल्या लाभार्थ्यांना म्हाडाने लवकरात लवकर घरांचा ताबा द्यावा. जेणेकरून त्यांचा गृहप्रवेश लवकर होऊ शकेल. आपण लवकरच पंतप्रधान आवास योजनेत अत्यल्प उत्पन्न गटासाठी खोणी, शिरढोण, विरार बोळींज, गोठेघर येथे सदनिका देणार आहोत. त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाली आहे. केंद्राचे दीड लाख, आणि राज्य शासनाचे एक लाख अनुदान त्यासाठी मिळणार आहे. या माध्यमांतून अनेकांचे घराचे स्वप्न साकार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवस असो किंवा रात्र, चोवीस तास राबणारे सरकार अशी आमची ओळख आहे. नागरिकांची कामे त्वरीत व्हावीत आणि त्यांना खेटे मारावे लागू नयेत, यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यांत मुख्यमंत्री सचिवालये सुरु केली आहेत. शासन आपल्या दारी उपक्रम सुरू केला आहे. मंत्रालयात त्रास होऊ नये म्हणून अद्ययावत सेन्ट्रल रजिस्ट्री सुरू केली आहे. या माध्यमातून समाजाभिमुख, लोकाभिमुख कारभार आम्ही करत आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येकाला घर या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे, याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. येत्या काळात प्रधानमंत्री आवास योजना आणि म्हाडाच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेघरांना मिळवून देण्याचे काम महाराष्ट्र शासनाकडून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात रिमोटद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार कथोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डिग्गीकर यांनी केले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT