मुंबई

Mumbai News : मुंबईत बीकेसी सर्वाधिक प्रदूषित !

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  २०२२-२३ हे वर्ष मुंबईकरांसाठी मागील ४ वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक प्रदूषित वर्ष ठरले असून वातावरणातील धुलीकणाचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. त्यातही मुंबईचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखला जाणारा बीकेसीचा परिसर हा सर्वाधिक प्रदुषित असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण अहवालात म्हटले आहे.

या अहवालानुसार बीकेसीच्या हवेत घातक धुलीकण पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) १० ची पातळी १२१ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवण्यात आली. केंद्र सरकारने सुरू केलेली चेंबूर, भांडुप, बीकेसी, कुलाबा, अंधेरी, मालाड, माझगाव, वरळी आणि बोरिवली या शहरांमध्ये नऊ ठिकाणी हवेच्या गुणवत्तेची देखरेख केंद्रे असून यापैकी बीकेसीमध्ये सर्वाधिक प्रदूषण आढळून आले.

हवेतील घातक असलेले धुलीकण पीएम १० आणि पीएम २.५ यांचे सरासरी पेक्षा अधीक प्रमाण या वर्षात होते. त्यात मुंबई शहरातच्या मध्यावर असलेला वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात गेल्या चार वर्षांपैकी तीन वर्षांपासून सरासरी प्रदूषण पातळी जास्त आहे. २०२२-२३ दरम्यान, वार्षिक सरासरी पीएम १० पातळी १२१ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली, तर २०२१-२२ मध्ये ती ११७ होती. २०२०- २१ मध्ये सरासरी पीएम १० पातळी १२२ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होती. आणि २०१९- २०मध्ये ती ११४ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होती.

मुंबईत सततचीधावती वाहने, वाहतूक कोंडी, सुरू असलेली बांधकाने आणि शहरात सुरू असलेले विविध प्रकल्प यामुळे हवेतील धुलीकणांचे प्रमाण वाढत असून सूक्ष्म धूलिकण सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईडचे हवेतील प्रमाण वाढत आहे. धूळ कमी करण्यासाठी सर्व बांधकामासाठी मार्गदर्शक तत्त्व तयार करण्यात आली आहेत. यामध्ये पाणी शिंपडणे आणि धूळ रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी बांधकामाच्या आसपास उंच पत्रे बसवणे आदींचा समावेश असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबई प्रदूषण नियंत्रण कृती आराखड्यांतर्गत पालिकेने प्रदषित भागात पाणी शिंपडण्यासह यांत्रिकी झाडूने रस्त्याची सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रिक बेस्ट बसचा वापर वाढविण्याची योजना सत्यात उतरत असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT