मुंबई : औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी आवश्यक सुविधा नसल्याचे मोठे चित्र समोर आले आहे. मुंबई विभागातील तब्बल 27 महाविद्यालयांत सर्वाधिक 15 महाविद्यालये ठाणे जिल्ह्यातील आहेत. या महाविद्यालयांना सुविधांची पूर्तता करण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
महामुंबईत असलेल्या 27 महाविद्यालयांत 14 पदवी अभ्यासक्रमाची तर 13 पदविका अभ्यासक्रमाची महाविद्यालये आहेत. ठाण्यातील 15 पैकी सात पदवी आणि आठ पदविकेची महाविद्यालये आहेत. त्यानंतर पालघर जिल्ह्यात पाच (पदवी-2, पदविका-3), रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी तीन (रायगड- पदवी 2, पदविका 1; रत्नागिरी- पदवी 2, पदविका 1), तर सिंधुदुर्गात एका पदवी महाविद्यालयात सुविधांचा अभाव असल्याचे औषधनिर्माण परिषद (पीसीआय)च्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.
मुंबई विभागापुरतेच हे चित्र मर्यादित नसून, संपूर्ण राज्यभर अशीच परिस्थिती आहे. राज्यातील 176 महाविद्यालयांना पीसीआयने निकष न पाळल्याबद्दल नोटीस बजावली असून, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सर्वाधिक धोक्याच्या यादीत आला आहे. तेथे तब्बल 60 महाविद्यालये (पदविका-55, पदवी-5) सुविधा अपुर्या असल्याच्या गटात आहेत. नागपूर विभाग 42 महाविद्यालयांसह (पदविका-39, पदवी-3) दुसर्या क्रमांकावर असून, त्यापाठोपाठ मुंबई व पुणे विभागात प्रत्येकी 27 महाविद्यालयांचा समावेश आहे. नाशिक विभागात 16 पदवी महाविद्यालये तर अमरावतीत चार पदवी महाविद्यालयांत सुविधा अपुर्या आढळल्या आहेत.
प्रवेशाला सुरुवात...
राज्यातील बी. फार्मसी प्रवेश प्रक्रियेत 52 हजार 265 विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या यादीवर हरकती नोंदविण्यासाठी 9 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असून विद्यार्थ्यांना त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसंबंधी तसेच गुणवत्तेत झालेल्या त्रुटींवर आक्षेप नोंदविता येणार आहेत. त्यानंतर या हरकतींची छाननी करून 12 सप्टेंबर रोजी अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध होणार आहे.
महामुंबईतील महाविद्यालये
जिल्हा पदवी पदविका
ठाणे 7 8
रायगड 2 1
पालघर 2 3
रत्नागिरी 2 1
सिंधुदुर्ग 1 0