मुंबई : राजन शेलार
ठाण्यातील ऐतिहासिक मध्यवर्ती तुरुंगात म्युझियम उभारण्यासाठी, तर शहरातील एका सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृह स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या बदल्यात ठाणे कारागृहासाठी पडघा येथील पिसे गावाजवळ 50 एकर, तर नागपूर येथील कारागृहासाठी चिंचोली गावाजवळ 80 एकर जागा देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कारागृहाच्या स्थलांतराला आणि त्याबदल्यात जागा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.
ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला तुरुंग हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. पूर्वी हा किल्ला होता, जो पोर्तुगीजांनी बांधला होता आणि नंतर ब्रिटिशांनी ताब्यात घेऊन त्याचे तुरुंगात रूपांतर केले. या किल्ल्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना कैद करण्यात आले होते. 20 ते 22 एकर जागेवर पसरलेल्या या तुरुंगात सद्या क्षमतेपेक्षाही जास्त कैदी आहेत.
हा तुरुंग आजही अस्तित्वात असला तरी त्याची ओळख केवळ गुन्हेगारांची बंदिशाळा म्हणून न राहता, स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाच्या स्मृती जतन करणारी जागा म्हणून व्हायला हवी, यासाठी तेथे संग्रहालय व्हावे, अशी मागणी ठाण्यात जोर धरू लागली आहे. त्यासंदर्भात ठाणे महानगरपालिकेने ठराव करून हा प्रस्ताव थेट सरकारकडे पाठवला आहे. त्याबदल्यात महसूल विभागाची ठाणे जिल्ह्यातील पिसे गावातील 20 हेक्टर (50 एकर) जागा देण्यात येणार आहे.
राज्यात खुले कारागृह (19), मध्यवर्ती कारगृह (9) व जिल्हा कारागृह (28) आणि इतर लहान कारागृहे मिळून एकूण 60 कारागृहे आहेत. यापैकी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहाचेही स्थलांतर होणार आहे. शहरातील एका सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पासाठी कारागृहाची जागा दिली जाणार आहे. महसूल विभाग चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.
या कारागृहाच्या बदल्यात नागपूरमधील चिंचोली येथील 80 एकर जागा दिली जाणार आहे. गृह विभागाने ठाणे व नागपूर येथील कारागृहाचे स्थलांतर आणि त्याबदल्यात देण्यात येणार्या जागेबाबत प्रस्ताव तयार केला आहे. या दोन्ही प्रस्तावांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजूरी दिली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. दरम्यान, हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणून त्याला मंजूरी दिल्यानंतरच कारागृहाच्या स्थलांतराला वेग येणार आहे.
ठाणे कारागृहात सद्या क्षमतेपेक्षाही जास्त कैदी आहेत. तर कारागृहाच्या स्थलांतरानंतर पिसे गावाजवळ 50 एकर जागा देण्याचा निर्णय झाला असला तरी ही जागाही अपूरी पडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नव्या कारागृहाच्या नियमानुसार तुरुंग बनविण्यासाठी आणखी जागेची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे गृह विभागाने 50 एकर जागे व्यतिरिक्त आणखी 20 ते 22 एकर जागेची मागणी केली आहे.
गृह विभागाकडून या प्रस्तावांवर सकारात्मक विचार केला जात आहे. दोन्ही कारागृहे स्थलांतरित करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत आणि योग्य वेळी त्यांना मान्यता दिली जाईल. ठाणे महानगरपालिकेने ठाणे कारागृहातील रचनेत बदल न करता संग्रहालयाचा प्रस्ताव दिला आहे.राधिका रस्तोगी, अतिरिक्त मुख्य सचिव, गृह (कारागृहे)